chief minister eknath shinde mumbai development balasaheb thackeray aapla dawakhana zws 70 | Loksatta

महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई हे जगातले सर्वात सुंदर शहर करण्याचा आमचा मानस असून त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे.

महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
संग्रहित फोटो/लोकसत्ता

मुंबई: मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार असून सामान्यांना मोफत उपचार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली. मुंबईला जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई फस्र्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत मुंबई सुशोभीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदीबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी मुंबई फस्र्ट संस्थेचे निरदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्विनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई हे जगातले सर्वात सुंदर शहर करण्याचा आमचा मानस असून त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहित रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चौक, रस्ते, पदपथ, फ्लायओव्हर यांच्या सुशोभीकरणाला सुरुवात झाली आहे. कोळीवाडय़ांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोळीवाडय़ांचा विकास केला जात असून तेथील खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी आपला दवाखाना उपक्रमाचे मुंबई फस्र्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 02:31 IST
Next Story
अभ्यासक्रम अर्धवट सोडणाऱ्यांनाही कौशल्यानुसार प्रमाणपत्र; येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी