‘एमपीएससी’ भरतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांनी अद्याप मागणीपत्र सादर न केल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. कोणत्याही परिस्थितीत सर्व विभागांनी तात्काळ मंजूर पदांचा आढावा घेऊन आपले मागणीपत्र ३० सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सचिवांना दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांचा तपशील ३० सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे निर्देश याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन हे प्रस्ताव ‘एमपीएससी’कडे पाठवायचे होते. परंतु, वारंवार निर्देश देऊनही काही विभागांनी पदांचे मागणीपत्र न पाठविल्याने नवीन पदभरती प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. ‘लोकसत्ता’ने ‘एमपीएससीच्या जाहिरातीला नवे वर्ष उजाडणार’ या मथळ्याखाली २१ सप्टेंबरला या संदर्भातील वृत्त दिले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी मागणीपत्र पाठविण्याचे निर्देश मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.

 ‘एमपीएससी’च्या पदभरती जाहिरातीला विलंब होत असल्यानेच पुण्याच्या स्वप्निल लोणकर या तरूणाने अधिवेशन सुरू असताना आत्महत्या केली. त्याची गंभीर दखल घेत सरकारच्या वतीने एमपीएससीच्या १५ हजार ५११ पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री वारंवार या प्रक्रियेचा आढावा घेत असूनही विभागांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पदभरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

शासन निर्णयानंतरही प्रशासकीय विभागांकडून ‘एमपीएससी’ला मागणीपत्र देण्यास विलंब होत असल्याने ‘एमपीएससी’च्या जाहिरातीला नवे वर्ष उजाडणार’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने २१ सप्टेंबरला प्रकाशित केले होते.   या वृत्ताची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.