मुंबई:राज्यातीलसत्तांतर नाटय़ाच्या काळात केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीमधील वास्तव्याच्या काळात प्रसिद्ध कामाख्या देवीसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवस केला होता. मुख्यमंत्रीपद मिळाल्याने नवस फेडण्यासाठी शिंदे आपल्या समर्थक मंत्री, खासदार, आमदार आणि कुटुंबीयांसह शनिवारी गुवाहाटीला जाणार आहेत.
चार महिन्यांपूर्वी शिवसेनेला खिंडार पाडून महाविकास आघाडी सरकार पाडताना शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह आधी गुजरातमधील सुरत आणि नंतर आसामधील गुवाहाटीला तळ ठोकला होता. या वास्तव्याच्या काळात शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. गुवाहाटीमधून मुक्काम हलविताना सर्व आमदारांनीही देवीचे दर्शन घेतले होते.
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी गुवाहाटीला येणार असल्याचे तेव्हाच शिंदे यांनी जाहीर केले होते. नवसपूर्तीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेले सर्व खासदार-आमदार कुटुंबीयांसह गुवाहाटीचा दौरा करणार आहेत. हे सारे खास विमानाने गुवाहाटीला जाणार आहेत. सर्व खासदार-आमदारांना सकाळी सात वाजता मुंबई विमानतळावर पोहचण्याचे निरोप देण्यात आले आहेत. गुवाहाटीत या सगळय़ांचा मुक्काम पुन्हा एकदा ’रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलमध्ये असणार आहे. या दौऱ्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांची एकनाथ शिंदे सदिच्छा भेट घेण्याची शक्यता आहे. आसाम सरकारने शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या आमदार, खासदारांना राज्य अतिथीचा दर्जा दिला असून त्यांचा पाहुणचार केला जाणार आहे.
‘मनगटामध्ये ताकद, ज्योतिषाची गरज नाही’
कराड : ज्योतिषाला हात दाखवण्याची मला गरज नाही. कारण समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मनगटामध्ये ताकद असायला हवी आणि ते बळ मला धर्मवीर आनंद दिघे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे. आणि मनगटातील ताकद आम्ही ३० जूनलाच दाखवली असल्याचा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर साधला. दैनिक ‘सामना’मधील ‘मुख्यमंत्र्यांचे हात दाखवून अवलक्षण’ या टीकेला उत्तर देताना, संजय राऊत हे महान नेते असल्याची खोचक टिपणी करून, देवदर्शन करणे गुन्हा आहे का, असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.