मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास तिचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी करावी, सर्व महापालिकांनी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच पावसाळ्यात सर्व अधिकाऱ्यांनी २४ तास सज्ज रहावे, आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. मान्सूनपूर्व आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. आपत्ती निवारण ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपत्तीच्या वेळी तत्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता राज्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने ‘मॅपिंग’ करावे. दरडी कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. यात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा ११० ते ११९ टक्के पावसाचा आंदाज आहे. जास्त पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महापालिकांनी विशेष तयारी ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाण्याच्या विसर्गासाठी आंतरराज्य समन्वय ठेवावा. ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पूर यामुळे संपर्क तुटतो अशा ठिकाणी अन्नधान्याचा अधिक साठा पुरवण्यात यावा. विद्याुत विभागाने त्यांची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे, राज्यातील आपत्ती प्रवण भागांचे अद्यायावत नकाशे हवाई दलास द्यावेत, महापालिकांनी रस्त्यांची कामे करताना लावलेले अडथळे पावसाळ्यापूर्वी काढून टाकावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नौदल, वायुलद, सैन्यदल, सागरी सुरक्षा दल, एनडीआरअफ, एसडीआरएफ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि सर्व संबंधित विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त उपस्थित होते.
दरडी कोसळणाऱ्या भागांत सतर्कता
पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींचा प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घेतला आहे. राज्यात दरड कोसळणाऱ्या संभाव्य ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मे महिन्यात सुरू झालेेल्या वळवाच्या पावसात कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-विलवडे बोगद्यांच्या अलीकडे दरड कोसळली. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी गडावर भक्तांच्या गाडीवर दरड कोसळलेल्या घटनेची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. धोकादायक ठिकाणी वसाहती असल्यास रहिवाशांचे इतरत्र स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे.
लष्कराच्या ३८ तुकड्या तैनात
राज्यात पावसाळ्याच्या काळात लष्कराच्या ३८ तुकड्या तैनात राहणार आहेत, अशी माहिती लष्कराच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच चेतक आणि नौदलाचे हलिकॉप्टरही सज्ज असणार आहेत. नौदल आणि मुंबई महापालिका यांची खास संपर्क यंत्रणा असणार आहे. हवाई दलही सुसज्ज असून कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफ, रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी, ऊर्जा विभाग, मुंबई महापालिका, मुंबई पोलीस यांनीही मान्सूनसाठी केलेल्या तयारीची माहिती या वेळी दिली.