मुंबई: आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गरीब व गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळत असली तरी या योजनांच्या आर्थिक मदतीला असलेल्या मर्यादेमुळे कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांचा प्रश्न कायम राहतो. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून टाटा ट्रस्टसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारातून दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना ८९ कोटी पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक मदतीचा आधार मिळाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्यात १२ फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार करण्यात आला. अशा प्रकारचा हा पहिलाच करार असून, राज्यातील १५० गरजू रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
या कराराचा प्रत्यक्ष लाभही रुग्णांना मिळू लागला आहे. करारानंतर अवघ्या पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील विविध भागांतील नऊ गरजू रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांचा समावेश आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे कठीण झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने रुग्णांना उपचार मिळत असले तरी काही गंभीर आजारांच्या उपचारांचा खर्च योजनांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा मोठा असतो. विशेषतः प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आणि कर्करोगावरील दीर्घकालीन उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. अशा वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
टाटा ट्रस्टसोबतच्या कराराच्या धर्तीवर इतर नामांकित सामाजिक संस्थांशीही सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सामाजिक संस्थांनी दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी पुढे यावे आणि शासनाच्या प्रयत्नांना हातभार लावावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील आहेत. अधिकाधिक संस्थांचा सहभाग वाढल्यास राज्यातील हजारो गरजू रुग्णांना महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
‘पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये’ हा उद्देश ठेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, आरोग्य संस्था आणि सामाजिक संस्थांमध्ये समन्वय वाढविण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
