मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली असली तरी त्यावरूनही वाद  होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून ते मुख्यमंत्रीपदी आहेत. अशा वेळी विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेलाच कसे देता येईल, असा कायदेशीर व तांत्रिक मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे.

भाजप आणि शिंदे गटाकडून दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त असून त्या जागी कोणाची निवड करायची, याबाबत भाजपमध्ये विचारविनिमय सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. विधान परिषदेतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, भाई गिरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदींचा समावेश आहे. बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. दरेकर हे फडणवीस यांच्या विश्वासातील असून त्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राम शिंदे किंवा प्रवीण दरेकर यांच्यापैकी एकाची विधान परिषद सभापतीपदासाठी निवड होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यपाल नियुक्त १२ जागांर नियुक्ती झाल्याशिवाय सभापतीपदाची निवडणूक घेतली जाणार नाही. कारण १२ सदस्यांची भर पडली तरच भाजपला सभापतीपद मिळू शकते. विधान परिषदेत शिवसेनेचे १२ सदस्य असले तरी त्यापैकी तीन-चार सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. उपसभापतींनी विरोधी पक्षनेतेपदी दानवे यांची नियुक्ती केली असली तरी त्याची घोषणा सभागृहात होते. काही आमदार शिंदे गटाकडे गेल्यावर शिवसेनेची सदस्यसंख्या कमी झाल्यावर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केला जाऊ शकतो.