मुंबईतला वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई उपनगरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशाही सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरु रहावी जेणेकरुन काही अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडीत झाल्याने इतर काही अपघात घडणार नाही या दृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले
उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

मुंबईमध्ये आज (सोमवार, १२ ऑक्टोबर २०२०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झालं. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आलं. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.