मुंबई : ‘सध्या वैचारिक प्रदूषण बरेच वाढले आहे. यामुळे शनिवारच्या सभेत मी मनातील बोलणार आहे’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते उद्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जाहीर सभेत भाजप आणि मनसेचा प्रामुख्याने समाचार घेतील. या सभेच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने शक्तिप्रदर्शन केले जाईल. मुख्यमंत्री झाल्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच राजकीय सभा असणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्वत:च संकेत दिल्याप्रमाणे या सभेत ते विरोधकांचा समाचार घेत राजकीय हल्ला चढवतील, असे दिसते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चार महिन्यांतच करोनाची टाळेबंदी झाली. त्यामुळे खुल्या मैदानावरील शिवसेनेचा दसरा मेळाव्यासह इतर राजकीय जाहीर सभा झाल्या नाहीत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन किंवा सभागृहात राजकीय मेळावे घेतले. पण शिवसेनेची ओळख असलेली खुल्या मैदानातील राजकीय सभा अडीच वर्षांत प्रथमच होणार आहे. त्यामुळे ही सभा मोठी व्हावी यासाठी शिवसेनेने नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत. राज ठाकरे यांच्या अलीकडे झालेल्या तीन सभांच्या तोडीचीच ही सभा असावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

भाजपने सुरू केलेले आरोप, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया, मनसेकडून मशिदींवरील भोंगे हटविण्याची केली जाणारी मागणी, राज्यपालांची नकारात्मक भूमिका, केंद्राचे असहकार्य आदी मुद्दय़ांवर मुख्यमंत्री विरोधकांचा समाचार घेण्याची चिन्हे आहेत. माझ्या मनात काही तुंबलेले नाही. पण मनात जे काही ते बोलणार आहे. त्यातून अनेकांच्या मुखपट्टय़ा गळून पडतील, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवडय़ात केले होते. त्यानुसार ते शनिवारच्या सभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतील.