मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना; मुंबईतील स्थितीचा आढावा

मुंबई : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षित आपत्तींचा सामना करण्यासाठी दक्ष राहावे आणि दरडग्रस्त भाग व मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रशासनाला दिला. मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये अधिक सावधगिरी व समन्वयाची गरजही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त के ली.

मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा.

विशेषत: दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठय़ा प्रमाणावर ढिगारा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे.

उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या मनोऱ्यांखाली मोठय़ा प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सावध करावे, काही ठिकाणी भूमिगत वाहनतळांमध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसान झाले व भांडुप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याचे लक्षात घेता यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची व समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

कोविड केंद्र व  वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावे.  पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे रोग पसरू नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे, असेही त्यांनी सांगितले.

हवामान विभागाचा  इशारा

मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ असून ५० ते ६० किमी प्रति तास या वेगाने वारेही वाहतील. २३ जुलैला संभाव्य कमी दाबाच्या पट्टय़ामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा  हवामान विभागाचे जयंता सरकार यांनी बैठकीत दिला.

बाजारपेठांमध्ये पाणी

शनिवारी अचानक रात्री पावसाने जोर धरल्याने साहित्याचे नुकसान झाले. हिंदमाता परिसरातील दुकानांना याचा मोठा फटका बसला. रात्रभर पाऊस झाल्याने हिंदामाता परिसर पूर्ण पाण्याखाली होता. सकाळपर्यंत पाणी तसेच होते. दादासाहेब फाळके मार्ग, डॉ. बी. ए. मार्ग, सेंट पॉल मार्ग, गोविंदजी केणी मार्ग हे चारही बाजारपेठांचे रस्ते आणि २०० हून अधिक गाळे पाण्याखाली होते. ‘इथे बहुतांशी कपडय़ांची दुकाने असल्याने कपडे भिजून खराब झाले. हे लाखोंचे नुकसान आहे. निर्बंधाने आधीच आमचे कंबरडे मोडलेले असताना या संकटाने अधिकच दैना केली’, अशी खंत न्यू हिंदमाता मर्चंट असोसिएशनचे चेअरमन दिनेश त्रिवेदी यांनी बोलून दाखवली. मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. यामध्ये क पडे, धान्य आणि इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंचे अधिक नुकसान झालेले आहे. विशेष म्हणजे निर्बंधांमुळे शनिवारी सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पूर्वतयारी करणे व्यापाऱ्यांना शक्य झाले नाही.

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात पाणी

’बोरीवली पूर्वेकडील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी शिरले.

’रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर पकडला. त्यानंतर मध्यरात्री पोलीस ठाण्यात पाणी साचले.

’जवळपास दोन फु टांपर्यंत पाणी  होते. त्यामध्ये पोलीस ठाण्यातील साहित्याचे नुकसान झाले.

’पाणी ओसरण्यास दोन ते तीन तास लागले. परिणामी त्यातच कामकाज करावे लागले, अशी माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.

मोनो-मेट्रो सेवा सुरळीत

रविवारच्या मुसळधार पावसाचा मोठा फटका लोकल आणि बेस्टला बसला. मात्र त्याच वेळी मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) ची वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)च्या प्रवक्त्याने दिली आहे. तर मोनोरेल (चेंबूर ते जेकब सर्कल)  सेवेवर अजून तरी कोणताही परिणाम झाला नसल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.  त्याच वेळी एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांत पाणी साचणे वा इतर कोणत्याही मोठय़ा तक्रारी समोर आलेल्या नाहीत.

पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि आताच्या पावसाने लक्षात आले आहे हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी यंत्रणा व  कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे, सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व नियंत्रण कक्षांना एकमेकांशी े संपर्कात राहण्यास सांगावे.

      उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

विहार तलाव ओसंडला

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या लहान दोन तलावांपैकी एक असलेला विहार तलाव रविवारी सकाळी ९ च्या सुमारास भरून वाहू लागला. गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी हा तलाव भरून वाहू लागला होता. सुमारे २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर जलधारण क्षमता असलेला विहार तलाव रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ओसंडून वाहू लागला. मुंबईकरांना सात तलावांमधून पाणीपुरवठा करण्यात येत असून विहार आणि तुळशी हे सर्वात लहान तलाव आहेत. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लिटर (नऊ कोटी लिटर) पाणीपुरवठा करण्यात येतो.