scorecardresearch

नारायण राणे यांना जो न्याय तोच पटोले यांना का नाही?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती.

Bjp Chandrakant Patil reaction to the merger of ST employees

चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. पंतप्रधानांना थेट मारण्याची धमकी देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तोच न्याय का नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर  पोलीस जेव्हा माणूस पाहून गुन्ह्याबद्दल कायदेशीर कारवाई करतात, तेव्हा राज्य अधोगतीकडे जाते, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो, असे वक्तव्य करून ते स्थानिक गुंडाबाबत होते, अशी सारवासारव पटोले यांनी नंतर केली होती.  पाटील म्हणाले, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केल्यावर लगेच कारवाई केली गेली, मात्र पंतप्रधानांबद्दल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोलेंवर कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलीस दबावाखाली काम करीत आहेत.

फडणवीस यांची टीका

शारीरिक उंची वाढल्याने बौद्धिक उंची वाढते, असे नाही, अशी टीका करीत विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षिततेला धक्का बसणारा प्रकार झाला. काँग्रेस नेत्यांच्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल जी असूया आहे, ती या वक्तव्यातून दिसून येते.मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडीदेवी म्हटल्यावर पोलीस लगेच रात्री भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी गेले व कारवाई केली; पण पंतप्रधानांबाबत वक्तव्य करूनही पटोले यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. राज्यात कायदा माणूस पाहून चालत आहे.

पटोले यांच्या गावात मोदी नावाची एकही व्यक्ती नाही. त्यांच्या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने ते घाबरले आणि नंतर सारवासारव केली, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोढा यांचा उपोषणाचा इशारा

नाना पटोले यांच्याविरोधात बुधवारी सकाळपर्यंत गुन्हा न नोंदविल्यास चर्चगेट येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसण्याचा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे. लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली.

नाना पटोलेंचा दावा पोलिसांनी फेटाळला

नागपूर : मोदी नावाच्या गावगुंडाला पकडण्यात आल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला दावा भंडारा पोलिसांनी फेटाळून लावला असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. लाखनी (जि.भंडारा) येथे  पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले  आहे. आपले वक्तव्य पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात नव्हते तर या नावाच्या गावगुंडासंदर्भात होते, त्याला पकडण्यात आले आहे, असा दावा पटोले यांनी सोमवारी केला होता. मात्र भंडारा पोलिसांनी या नावाच्या कोणत्याही गुंडाला पकडण्यात आले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे सांगितले. तसेच पटोले यांचे मूळ गाव सुकळीतील नागरिकांनीही मोदी नावाचा कुठलाही गुंड नसल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. दरम्यान, भाजपच्या पायाखालची वाळू सरकत असल्यानेच त्यांनी आंदोलन सुरू केले आहे, असे पटोले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister union minister narayan rane arrested congress state president nana patole bjp state president chandrakant patil akp

ताज्या बातम्या