‘ब्लू व्हेल’ या अँड्रॉईड गेममुळे एका १४ वर्षांच्या मुलाचा जीव गेला, ही घटना उघडकीस आल्यानंतर लगेचच शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हा गेम बंद करण्याबाबत तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसंच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ब्लू व्हेलचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत या गेमसंदर्भात निवेदन दिलं.

ब्लू व्हेल हा खेळ पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे हे सरकारला मान्य आहे. यासंदर्भातली आवश्यक ती सगळी माहिती घेतली जाईल. हा इंटरनेट बेस्ड गेम असल्यानं या गेमचा सर्व्हर भारतातून होस्ट केला जात नाही त्यामुळे तो कसा थांबवता येईल याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

ब्लू व्हेल या गेममुळे अंधेरीतल्या शेर -ए पंजाब कॉलनीमध्ये १४ वर्षांच्या मनप्रीत सहाना यानं ब्लू व्हेल गेमच्या आहारी जाऊन इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. भारतात ब्लू व्हेल या खेळामुळे पहिला बळी गेला आहे. मात्र जगभरात या गेमची दहशत पसरलेली आहेच.

मोबाईलवर हा गेम इन्स्टॉल केला की पुन्हा डिलिट करता येत नाही. या खेळात एकूण ५० लेव्हल आहेत. या लेव्हल्स खेळताना प्लेयरची एकप्रकारे परीक्षाच घेतली जाते. या गेममधला शेवटचा टास्क हा छतावरून उडी मारण्याचा आहे. रशियामध्ये या गेममुळे १३० मुलांनी आत्महत्या केल्या आहेत, तर इंग्लंड, इटली आणि अमेरिका या देशांमध्येही या खेळाचं लोण पोहचलं आहे. अत्यंत धोकादायक गेम अशीच याची ख्याती आहे. १२ ते १९ या वयोगटात या गेमची क्रेझ आहे.

काय आहे ब्लू व्हेल गेम?

गुगल प्लेवरून हा गेम डाऊनलोड करता येतो, हा गेम एकदा डाऊनलोड केला की डिलिट करता येत नाही. या गेममध्ये प्रत्येक प्लेअरला एक मास्टर असतो. हा मास्टर सांगेल त्याप्रमाणे टास्क पूर्ण कराव्या लागतात. स्वतःच्या रक्तानं ब्लू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करून स्वतःला इजा करणं, दिवसभर हॉरर सिनेमा बघणं, रात्रभर जागरण करणे हे आणि अशा प्रकारचे टास्क ५० दिवस दिले जातात.

खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे खेळ खेळणाऱ्या प्लेअरला आत्महत्या करण्यासाठी आव्हान दिलं जातं. छतावर उभं राहून उडी मारण्याचा टास्क हा शेवटचा आहे. या खेळाचा मनावर इतका परिणाम झालेला असतो की अनेकजण हिंमत सिद्ध करण्यासाठी आत्महत्या करतात.