मुख्यमंत्र्यांचे लंडनमध्ये सूतोवाच
राज्यात स्मार्ट सिटी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापौरांना सक्षम करावे लागेल, त्यांचे अधिकार वाढवावे लागतील, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लंडनमध्ये केले.
मुख्यमंत्री सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. लंडनमध्ये आयोजित प्रबोधन लीडर्स परिषदेत त्यांनी ब्रिटन व भारतातील अनेक उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद लाधला. परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ वाढत्या नागरीकरणाचे नियोजन करणे, एवढेच स्मार्ट शहर निर्मितीमागचे उद्दिष्ट नसून नागरिकांना अधिकाधिक चांगल्या व कार्यक्षम सेवा मिळाव्यात, पायाभूत सुविधांच्या विकासातून रोजगार निर्मिती व्हाही हे या योजनेचे प्रमुख धेय आहे.
स्मार्ट सिटी निर्मिती योजनेवर अधिक प्रकाश टाकताना शहरी विकास, खासगी भागिदारी, नवीन तंत्रज्ञान व महापौरांचे अधिकार यावर त्यांनी तपशीलवार भाष्य केले. महापौरांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करताना त्यांना व्यापक अधिकार प्रदान करणे आवश्यक आहे, आपले सरकार महापौरांचे अधिकार वाढविण्याचा विचार करीत आहे, असे त्यांनी सूतोवाच केले.
सामान्य नागारिकांना चांगल्या व योग्य दरात सेवा मिळाल्या पाहिजेत, याचाही विचार करावा लागेल. त्याचबरोबर पाणी व वीजेचा वापर काटकसरीने करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईत नैनाच्या माध्यमातून मुंबईपेक्षा मोठे नवे शहर विकसित होणार आहे. राज्यात दहा स्मार्ट सिटी तयार करण्यात येणार आहेत, त्यात जनतेला अधिक चांगले जीवन जगता यावे, रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याचा प्रामुख्याने विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लंडनमधील स्टरलाईट उद्योग समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल व वेदांत समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉम अल्बानीज यांच्याशी चर्चा केली. औरंगाबाद येथील स्टरलाईट प्रकल्पात पुढील पाच वर्षांत सोळा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस असल्याचे अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.