गेल्या १५ वर्षांत करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या खरेदीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या समितीला मंत्र्यांचीही चौकशी करण्याचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे कथित गैरव्यवहाराचा आरोप झालेल्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक आजी माजी मंत्र्यांना मुख्य सचिवांच्या समितीकडे स्पष्टीकरण द्यावे लागण्याची शक्यता आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांनी पुरावे न देता व नोटीस न देता मंत्र्यांवर आरोप केल्याचे सांगितले. त्यांनी काही खात्यांमधील गेल्या काही वर्षांतील गैरव्यवहारांचा मुद्दा उपस्थित केल्याने १५ वर्षांमधील खरेदीची चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.