मुंबई : राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. पोलीस, महापालिका, रेल्वे, मेट्रो आदी यंत्रणांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात आणि धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटक आणि रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली.
मुख्य सचिवांनी रेल्वे, मेट्रो, पोलीस, महानगरपालिका, प्रशासकीय यंत्रणा आदींची बैठक घेऊन रेल्वे प्रवासी सुरक्षा आणि दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली. पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. धोकादायक पर्यटनस्थळांच्या जागी मागदर्शक सूचना लावण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवावा आणि दुरुस्ती होईपर्यंत ती पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवावीत. दक्षता न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश सौनिक यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व रस्त्यांवरील पुलांचे सर्वेक्षण करुन जुन्या पुलांची दुरुस्ती अथवा आवश्यकतेनुसार नवीन पूल उभारण्याचे काम हाती घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पेरणीची घाई नको
अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर १६जूनपासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
क्षेत्रनिहाय जबाबदारीचे वाटप
कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सौनिक यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. नागरिकांच्या जीविताच्या रक्षणाला प्राधान्य देऊन क्षेत्रनिहाय जबाबदारीचे वाटप करण्याची सूचना करून गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना आदींची मदत घेण्याच्या सूचना सौनिक यांनी दिल्या.