राज्यात चिकुनगुनिया, डेंग्यूचे वाढते रुग्ण 

मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून राज्यात ७१६९ रुग्णांना लागण झाली आहे.

zika virus case Mosquito bite
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत डेंग्यूमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचे सर्वाधिक सहा मृत्यू नागपूरमध्ये, तर भंडारा, वर्धा, चंद्रपूर, ठाणे आणि नगरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या रोगाचे सर्वाधिक रुग्णही नागपूर विभागात आणि नाशिकमध्ये आहेत. मुंबईत जुलैच्या तुलनेत आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. मुंबईत डेंग्यूचे १३८ तर लेप्टोस्पायरोसिसचे १२३ रुग्ण आढळले.

दरवर्षी साधारण ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढायला सुरूवात होते. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात राज्यात ३३५६ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. परंतु यावर्षी ऑगस्टमध्येच रुग्णसंख्या २५५४ वर गेली आहे. गेल्यावर्षी डेंग्यूमुळे दहा मृत्यू झाले होते, तर यावर्षी ऑगस्टमध्ये मृतांची संख्या आतापर्यंत ११ आहे.

एडिस जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणाऱ्या चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्याही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. चिकुनगुनियाचे रुग्ण २०१९ मध्ये २९८, तर २०२० मध्ये ७८२ इतके आढळले होते, परंतु यावर्षी ऑगस्टमध्येच रुग्णांची संख्या ९२८ झाली आहे.

लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे लेप्टाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. २०२० या वर्षभरात राज्यात १०३ लेप्टोचे रुग्ण आढळले होते, तर यावर्षी ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या १८४ झाली आहे. लेप्टोमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मलेरियाचा प्रादुर्भाव 

मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून राज्यात ७१६९ रुग्णांना लागण झाली आहे. गेल्यावर्षी करोनाकेंद्री आरोग्य व्यवस्था झाल्यामुळे मलेरियाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे २०२० मध्ये रुग्णांची संख्या सुमारे एक लाख २९ हजारावर गेली होती. त्या तुलनेत यावर्षी रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु २०१९ च्या तुलनेत (४०७१ रुग्णसंख्या) मात्र हे प्रमाण जास्तच आहे.

दूषित पाण्यामुळे आजार

दूषित पाण्यामुळे होणारे कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ, अतिसार सारख्या जलजन्य आजारांचे प्रमाणही काही अंशी वाढले आहे. २०२० मध्ये जानेवारी ते डिसेंबर या काळात ११७४ रुग्ण होते, तर यंदा ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या १०६५ झाली आहे. यात प्रामुख्याने गॅस्ट्रो (३०२) आणि अतिसारची (७६३) लागण अधिक झाल्याचे दिसून येते. ‘पूरस्थितीमध्ये जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. पूरस्थिती असलेल्या भागांमध्येच हे प्रमाण जास्त आढळले आहे’, असे साथरोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

घरोघरी पाहणी करण्यात येत असून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे आरोग्य विभागाचे मुख्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chikungunya an increasing number dengue patients state akp