एका ‘ट्विट’मुळे बालकामगाराची सुटका

व्यवस्थापकाला अटक करत त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत मुलाची रवानगी डोंगरीच्या बालगृहात करण्यात आली आहे.

बाल सहाय्यक पोलीस पथकाची कामगिरी

समाजमाध्यमांचा वापर विनोद, गाणी, चेष्टा-मस्करीसाठी नेहमीच होत असतो, पण त्याचा विधायकपणे वापर केला तर समाजाला त्याची नक्कीच फायदा होऊ शकतो. हीच गोष्ट चांदिवलीच्या १९ वर्षीय राहुल यादवने सिध्द केली. कुटुंब-मित्रांसोबत हॉटेलात जाणाऱ्या राहुलने एका हॉटेलमध्ये बालकामगार काम करत असल्याचे पाहिले आणि मुंबई पोलिसांना ‘ट्विटर’वर कळविले. पोलिसांनीही तातडीने कारवाई करत १५ वर्षीय मुलाची हॉटेलातून सुटका केली. या मुलाला नेपाळहून बालकामगार म्हणून आणले असल्याचे तसेच त्याच्याकडून १०ते १२ तास काम करवून घेत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

१ मे रोजी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या ट्विटर खात्यावरुन बालमजूरी रोखण्याचे आवाहन करण्यात आले होते. २८१ ट्विटरकरांनी त्याला रिट्विटही केले. मात्र, राहुलने तातडीने मुंबई पोलीस आणि आयुक्तांना टॅग करत चांदिवली परिसरातील अनेक हॉटेलांमध्ये बाल कामगार सर्रास काम करत असल्याचे ट्विट केले. मुंबई पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत राहुलला प्रतिसाद देत, राहुलकडून माहिती घेतली. तेव्हा राहुलने पोलिसांना पूर्ण माहिती दिली.

मुंबई पोलिसांच्या बाल सहाय्यक पोलीस पथकाकडे (जापू) २ मे रोजी ही माहिती पोहोचवत लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

जापूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, शिंदे, हवालदार राणे, जाधव यांचे पथक चांदिवलीच्या स्पाईस अ‍ॅण्ड करी हॉटेलात दाखल झाले. त्यावेळी वेटर म्हणून १५ वर्षांचाच मुलगा त्यांच्या पुढे आला.

पोलिसांनी तातडीने या मुलाची सुटका करत, हॉटेलच्या मालकाचा शोध घेतला मात्र त्यावेळी हॉटेलचा व्यवस्थापक हजर असल्याचे पोलिसांना कळाले.

व्यवस्थापकाला अटक करत त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत मुलाची रवानगी डोंगरीच्या बालगृहात करण्यात आली आहे.

आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दत्ता पडसलगीकर यांनी प्रथमच ‘ट्विटर’ या समाजमाध्यमाच्या सहाय्याने मुंबईकरांनी संवाद साधला. शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी बहुतेकांनी वाहतूक नियमांच्या पालनाविषयी समाजात असलेल्या उदासीनतेबाबत प्रश्न उपस्थित करत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आवाहन केले. यावेळी मुंबईकरांनी विविध समस्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधत, त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष करुन वाहतूकीचे नियमांविषयी असलेला संभ्रम, दंडाची रक्कम याबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांबाबतही ट्विटरकरांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

तासभर चाललेल्या या गप्पांमध्ये आयुक्तांनी मुंबईला सुरक्षित शहर बनविण्याची ग्वाही दिली. तसेच, कुठलीही समस्या आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष किंवा ट्विटर माध्यमाचा वापर करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Child labour rescued due to one tweet

ताज्या बातम्या