जितेंद्र जोशीकडून उघड नाराजी
नाटक सुरू असताना प्रेक्षकांकडून होणारा गोंधळ, आवाज किंवा हुल्लडबाजी यांचा त्रास कलाकारांना होतो, हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. मात्र, रविवारी शिवाजी मंदिर येथे भरलेल्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाच्या प्रयोगात एका चिमुरडय़ाच्या गोंगाटाने मिठाचा खडा टाकला. संपूर्ण ‘हाऊसफुल्ल’ असलेला हा प्रयोग पूर्ण झाला खरा; पण तो संपताच नाटकातील अभिनेता जितेंद्र जोशी याने रंगमंचावर येऊन प्रेक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली.
दादर येथील शिवाजी मंदिर नाटय़गृहात रविवारी रात्री आठ वाजता ‘दोन स्पेशल’चा प्रयोग पार पडला. पाऊस असतानाही प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी करत हा प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ ठरवला. सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच प्रेक्षकांत बसलेल्या एका लहान मुलाच्या ओरडण्याने किंवा बडबडीमुळे प्रयोगात विघ्न आले. कलाकारांनी तरीही प्रयोग पुढे नेला आणि व्यवस्थित पारही पडला. प्रेक्षक बाहेर पडत असतानाच रंगमंचाचा पडदा वर करून जितेंद्र जोशीने ‘एन्ट्री’ केली.
प्रेक्षकांना जितेंद्र जोशी याने आधी सलाम केला. आपले कौतुक होते आहे, असे सुरुवातीला प्रेक्षकांना वाटले. नाटकाच्या मुख्य अभिनेत्याकडूनच्या त्यांच्यावर होणाऱ्या स्तुतिसुमनांना वर्षांव त्यांनी टाळ्यांच्या गजरात झेलला. पण, पुढे जितेंद्रने प्रेक्षकांकडून नाटकात आलेल्या व्यत्ययाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘अंगात १०४ इतका ताप असतानाही मी प्रयोग केला. पण प्रेक्षकांमध्ये कुणाकडे तरी असलेल्या लहान मुलाच्या सतत येणाऱ्या आवाजामुळे प्रयोग करताना सतत व्यत्यय येत होता. त्यामुळे संवाद सादर करत असताना त्रास झाला. प्रयोगादरम्यान लहान मूल आवाज करत असेल किंवा शांत बसत नसेल तर त्याला नाटय़गृहाबाहेर घेऊन जाण्याचे सौजन्य आपल्यामध्ये नाही. वयाने मोठय़ा झालेल्या प्रेक्षकांना काही कळत नसेल तर बहुदा ही लहान मुलेच हुशार झाली तर काही तरी होईल महाराष्ट्राचे!,’ अशा शब्दांत त्याने आपली उद्विग्नता व्यक्त केली. ‘दोन स्पेशल’ नाटकाच्या जाहिरातीत १२ वर्षांखालील मुलांना नाटकाला आणू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. मात्र तरीही काही प्रेक्षकांकडून लहान मुलांना आणले जाते, याकडेही नाटकाच्या संबंधितांनी लक्ष वेधले. या संदर्भात जितेंद्र जोशी, गिरिजा ओक यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.