मुंबई: १२ ते १४ वयोगटातील बालकांचे करोना प्रतिबंधात्मक लशीच्या दुसऱ्या मात्रेचे लसीकरण बुधवारपासून सुरू झाले आहे. दोन दिवसांत सुमारे ६०० बालकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. राज्यात १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाले. बालकांच्या लसीकरणाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद नसला तरी हळूहळू प्रतिसाद वाढत आहे. महिनाभरात या वयोगटातील सुमारे ४७ टक्के बालकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे ७८ टक्के बालकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या खालोखाल नाशिक, भंडारा, नगर, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक बालकांनी लस घेतली आहे.

या वयोगटाचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरणही २८ दिवसांनंतर म्हणजेच बुधवारपासून सुरू झाले आहे. दोन दिवसांमध्ये सुमारे ६०० बालकांना दुसरी मात्रा देण्यात आली असून त्यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक २०७ बालकांचे लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल सातारा, पुणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये बालकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये बालके अद्याप दुसरी मात्रा घेण्यासाठी न आल्यामुळे तेथे दुसऱ्या मात्रेचे शून्य लसीकरण झाले आहे. मुंबईत दोन दिवसांत ४५ बालकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

१२ ते १४ वयोगटातील बालकांना कोबरेव्हॅक्स ही लस दिली जात आहे. लशीच्या एका कुपीमध्ये २० मात्रा असल्यामुळे सुरुवातीला प्रतिसाद कमी असताना मात्रा वाया जाण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु आता दुसरी मात्राही सुरू केल्यामुळे प्रतिसादही वाढेल. त्यामुळे मात्रा वाया जाण्याचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिक, कोल्हापूरमध्ये लसीकरणात वाढ

नाशिक जिल्ह्यामध्ये या बालकांच्या लसीकरणात मागील आठ दिवसांत वेगाने वाढ झाली असून पहिल्या मात्रेचे लसीकरण ६८ टक्क्यांवरून थेट ७६ टक्क्यांवर गेले आहे. कोल्हापूरमध्येही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांत ६८ टक्क्यांवरून ७२ टक्क्यांपर्यत वाढले आहे.

  • महिनाभरात  सुमारे ४७ टक्के बालकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण.
  • सांगली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे ७८ टक्के बालकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण.  

मुंबईत संथगतीने..

राज्यात १२ ते १४ वयोगटातील लसीकरणामध्ये मुंबईत सर्वात कमी म्हणजे सुमारे १६ टक्के बालकांनी लस घेतली आहे. त्यानंतर परभणी, नागपूर, नांदेड आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. बालकांच्या या लसीकरणाला काही जिल्ह्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मुंबईसह १२ जिल्ह्यांमध्ये सुमारे ४० टक्क्यांपेक्षाही कमी बालकांनी पहिली मात्रा पूर्ण केली आहे.