मुंबई : मुलांना आई-वडील आणि आजी-आजोबांचे प्रेम आणि आपुलकी मिळण्याचा अधिकार आहे. त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी आणि कल्याणासाठी ते आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवून एका व्यक्तीला दोन वर्षांनंतर मुलांना भेटण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नुकतीच दिली.
न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने याप्रकरणी आदेश देताना याचिकाकर्त्यांच्या पालकांना नातवंडांना भेटण्यास परवानगी दिली. त्यावेळी कौटुंबिक वादाच्या प्रकरणांत मुलांचा ताबा न मिळालेल्या पालकांनाही त्यांच्या मुलांच्या सहवासात राहण्याचा. आनंद लुटण्याचा आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवण्याचा अधिकार आहे. त्यांना या अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही. मुलांना आई-वडिलांसोबत आजी-आजोबांचे प्रेम आणि आपुलकी मिळण्याचा अधिकार आहे. मुलांच्या वैयक्तिक विकासासाठी आणि सर्वागीण कल्याणासाठी हे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
याचिकाकर्त्यांची मुलांना भेटू देण्याची मागणी मान्य करताना न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. २०२० पासून आपण आणि आपले आई-वडील मुलांना भेटलेले नाहीत, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला होता. मुलांचे आजोबा आजारी आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या नातवंडांना भेटण्याची इच्छा आहे, असेही याचिकेवरील सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य उडाणे यांनी न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाने मार्च २०२२ला मुलांना भेटू देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही मुलांच्या आईने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी याचिकाकर्त्यांना त्यांना भेटू देण्यास नकार दिल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करून त्याला दोन दिवसांसाठी मुलांना भेटण्याची परवानगी दिली. त्याचवेळी याचिकाकर्ता आणि त्याच्या पत्नीचे समुपदेशन करण्याची आणि दोघांनी वादावर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याची सूचनाही केली.