मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची, तसेच लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीची दखल घेऊन रेल्वे पोलिसांनी मुंबईतील प्रमुख स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. विशेषतः चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), तिकीट तपासणी कर्मचारी आणि श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत.
गणेशोत्सवात मध्य रेल्वेच्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी अपेक्षित असल्याने आरपीएफ, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नियमित ३,५०० पोलिसांबरोबरच यंदा अतिरिक्त ४५० गृहरक्षक तैनात करण्यात आले असून, विशेष रेल्वेगाड्या आणि गर्दी नियंत्रणासाठी सुमारे २५० अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षकांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे.
‘लालबागचा राजा’ आणि ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या दर्शनासाठी जाणारे भाविक चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर उतरतात. त्यामुळे या दोन स्थानकांवर २१९ आरपीएफ जवान आणि ५५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विनातिकीट प्रवाशांवर कारवाईबरोबरच गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
मदतवाहिनीवर संपर्क साधण्याचे आवाहन सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल, दिवा, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास आरपीएफ, रेल्वे पोलीस, स्थानक व्यवस्थापक किंवा १३९ या मदतवाहिनीवर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
श्वान पथक तैनात
मुंबईच्या १३९ उपनगरीय स्थानकांवर दररोज ७५ ते ८० लाख प्रवाशांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर बेल्जियन मालिनोआ, लॅब्राडोर रिट्रिव्हर, जर्मन शेफर्ड आणि डॉबरमन जातींच्यां श्वानांची पथके लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये नियमित तपासणी करत आहेत. स्फोटके, अमली पदार्थ आणि इतर संशयास्पद वस्तू शोधण्यासाठी ही पथके तैनात करण्यात आली आहेत.
