पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना भूल देण्यासाठी ब्रिटनऐवजी चिनी बनावटीची यंत्रे देऊन कंत्राटदाराने पालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण मिटविण्यासाठी एक अतिरिक्त आयुक्तच प्रयत्न करीत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आला.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये भूल देण्याच्या यंत्रांची निकड लक्षात घेऊन प्रशासनाने २०१३ मध्ये ५१ इन्टिग्रेटेड अॅनेस्थेशिया यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ही यंत्रे खरेदी करण्यासाठी ६,४२,६०,००० रुपयांचे कंत्राट युनिव्हर्सल ऑरगॅनिक्स या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने २० ब्रिटन बनावटीची, तर ३१ चिनी बनावटीची यंत्रे पालिकेला पुरविली. चिनी बनावटीची काही यंत्रे जोगेश्वरी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरसह अन्य काही रुग्णालयांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहेत. भूल देणाऱ्या यंत्रांच्या पुरवठय़ात पालिकेची फसवणूक झाल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने पत्र लिहून पालिकेला दिल्यामुळे या प्रकरणाची पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.यंत्र खरेदी प्रकरणाच्या चौकशीमध्ये सीमाशुल्क, कंपनीची देयके, बँकेची हमी कागदपत्रे, तसेच ज्या कंपनीकडून ही यंत्रे खरेदी केली त्यांची देयके बनावट असल्याचे उघडकीस आले असून जकात चुकविल्याप्रकरणी या कंत्राटदाराला २.११ कोटी रुपयांचा दंडही पालिकेने केल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेची फसवणूक करणाऱ्या या कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करावा आणि त्याचे नाव कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी शिफारस चौकशी समितीने आपल्या अहवालात केली होती. मात्र पालिकेच्या ‘टाहो’ने (दक्षता पथक) या प्रकरणाला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही छेडा यांनी केला.या कंत्राटदाराला वाचविण्यासाठी एक अतिरिक्त आयुक्तच प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अद्याप कंत्राटदारावर कारवाई होऊ शकलेली नाही. या प्रकरणाची सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रवीण छेडा यांनी या वेळी केली. हे प्रकरण गंभीर असून त्याची चौकशी करून एक आठवडय़ात स्थायी समितीसमोर अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला दिले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2015 रोजी प्रकाशित
चिनी भूलयंत्रे पुरवून पालिकेची फसवणूक
पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना भूल देण्यासाठी ब्रिटनऐवजी चिनी बनावटीची यंत्रे देऊन कंत्राटदाराने पालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
First published on: 06-08-2015 at 04:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese agent cheat bmc