‘चायनीज’साठी मृत, कुजलेल्या कोंबडय़ांचा वापर ; जे. जे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार खाण्यासाठी जिवंत कोंबडय़ांचाच वापर करणे बंधनकारक आहे.

‘एफडीए’ची आता मुंबईत कारवाई

मुंबई : मुंबईतील रस्त्यावरील चायनीज स्टॉल आणि उपाहारगृहांमध्ये बनविण्यात येणाऱ्या चायनीज पदार्थासाठी मृत, कुजलेल्या कोंबडय़ांचा वापर करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अशा ठिकाणी मांसाहारावर ताव मारणाऱ्या खवय्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मेलेल्या, कुजलेल्या कोंबडय़ांची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईअंतर्गत बुधवारी एफडीएने जे. जे. पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार खाण्यासाठी जिवंत कोंबडय़ांचाच वापर करणे बंधनकारक आहे. मुंबईत नाशिक, पुणे आणि इतर जिल्ह्यांतून कोंबडय़ा आणल्या जातात. मुंबईत पोहोचण्यापूर्वी प्रवासात काही कोंबडय़ांचा मृत्यू होतो. मृत कोंबडय़ांची महापालिकेच्या मदतीने योग्य विल्हेवाट लावणे विक्रेत्यांना बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात मुंबईतील कोंबडी विक्रेत्यांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एफडीएने यापूर्वी अनेकवेळा कोंबडी विक्रेते आणि मेलेल्या, कुजलेल्या कोंबडय़ांची बेकायदा विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई केली आहे. पण तरीही ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरूच आहे. नळबाजार येथे अशा प्रकारे मेलेल्या, कुजलेल्या कोंबडय़ांची बेकायदा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएने जे. जे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती बृहन्मुंबई (अन्न), एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.

मेलेल्या, कुजलेल्या कोंबडय़ांची योग्य विल्हेवाट न लावता विक्रेते त्या दुकानाबाहेर फेकून देतात. काही नागरिक फेकलेल्या कोंबडय़ा जमा करून गोणीत भरून आसपासच्या चायनीज स्टॉलधारकांना, छोटय़ा उपाहारगृहांना स्वस्तात विकतात, असे केकरे यांनी सांगितले. अशा कोंबडय़ांचे सेवन करणे मानवी आरोग्यास घातक असते. या कोंबडय़ांच्या सेवनामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार होत असल्याचे अनेक संशोधनातून उघडकीस आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व बाबी लक्षात घेता तसेच नळबाजारमधील अशा प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील कोंबडी विक्रेत्यांविरोधात कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईत दोषींविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचेही केकरे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chinese stalls on the streets of mumbai use dead rotten hens for chinese food zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या