कोणतीही भूमिका साकारण्यापूर्वी त्या चित्रपटाचे म्हणणे काय आहे हे जाणून घेतल्यावरच भूमिका स्वीकारत असल्याचे अभिनेता चिन्मय मांडलेकर याने सांगितले. तसेच,“लोकांना चुकीचा संदेश देणारे किंवा प्रतिगामी विचारांची भूमिका असणारे चित्रपट मी कधीही कऱणार नाही”, असेही चिन्मयने ठामपणे सांगितले.
हेही वाचा >>>मुंबई : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाच्या निमित्ताने चिन्मयने लोकसत्ताशी संवाद साधला. त्यावेळी त्याने साकारलेल्या आजवरच्या भूमिकांविषयी चर्चा केली.अनेकदा कलाकारांच्या हातात दिलेल्या संहितेत चित्रिकरणादरम्यान अनेक बदल होतात. त्यामुळे त्या भूमिकेची वेगळीच प्रतिकृती मोठ्या पडद्यावर दिसते. “अनेकदा कलाकारांना चित्रपटाची ऐकलेली कथा आणि प्रेक्षक चित्रपटगृहांत पाहात असलेला चित्रपट यात बरीच तफावत असते. कारण बऱ्याच गोष्टी या कलाकारांच्याही हातात नसतात”, अशी खंतही चिन्मयने यावेळी व्यक्त केली होती.
हेही वाचा >>>मुंबई: मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडप्रकरणी उद्यापासून सुनावणी
“मी चित्रपटात साकारत असलेल्या भूमिकेचे महत्व त्या चित्रपटात काय आहे याचा मी विचार करतो. माझ्या वाट्याला आलेले पात्र जर या चित्रपटात नसते तर काय झाले असते याचाही मी विचार करतो. सुदैवाने आजवर मी ज्या भूमिका साकारल्या त्यांचे त्या त्या चित्रपटात अनन्यसाधारण महत्व होते आणि मी देखील त्या भूमिकांना पुरेपुर न्याय देण्याच्या प्रयत्न केला”, असे चिन्मयने सांगितले.