मुंबई : महाराष्ट्र सरकारचा यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गुरुवारी २०२५च्या पुरस्कारांची घोषणा केली. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी यांची राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन आदी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर यांच्या नावाने हे पुरस्कार प्रदान केले जातात.

प्रख्यात संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्शक अशी हृदयनाथ मंगेशकर यांची ओळख आहे. त्यांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटांसह भावगीत, भक्तिगीत व शास्त्रीय संगीतावर आधारित रचना खूप गाजल्या. प्रसाद ओक हे मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन क्षेत्रातील आघाडीचे अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते आहेत. धर्मवीर आणि धर्मवीर २ या चित्रपटांच्या दिग्दर्शनामुळे विशेष चर्चेत आले.

सलीम खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक. जावेद अख्तर यांच्यासह ‘सलीम–जावेद’ या जोडीने शोले, दीवार, जंजीर, डॉन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा व पटकथा लिहिल्या. राणी मुखर्जी या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री. ब्लॅक, हम तुम, मर्दानी, नो वन किल्ड जेसिका यांसारख्या चित्रपटांतील दमदार भूमिकांमुळे त्यांना अनेक राष्ट्रीय व फिल्मफेअर पुरस्कारांसह विविध सन्मान मिळाले आहेत.