मुंबई : कांदिवलीत एका व्यवसायिक इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी दुपारी चर्चगेट येथील महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या तळघरात आग लागली. दुपारी २ वाजता मुंबई अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली. सात मजली इमारतीच्या तळघरात आग लागली आहे. वरच्या मजल्यांवर अडकलेल्यांना न सुरक्षित बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरू आहे.

चर्चगेट आणि मरीनलाईन्स स्थानकादरम्यान असलेली आयकर भवन ही तळघर अधिक सात मजल्यांची इमारत आहे. इमारतीच्या तळघरात आग लागली होती. अग्निशमन दलाला दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन वरिष्ठ स्थानक अधिकारी, दोन स्थानक अधिकारी यांच्यासह तीन फायर इंजिन, पाण्याचे तीन टॅन्कर अशी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. आग सध्या तळघरापुरती मर्यादित आहे. सव्वा दोन वाजता आगीला लेव्हल-१ घोषित करण्यात आले. दरम्यान, वरच्या मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मुंबई अग्निशमन दलासह पोलीस, BEST, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि BMC वॉर्ड कर्मचाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. आगीत कोणाला दुखापत झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.