मुंबई : गेल्या महिन्यात चर्चगेट रेल्वे स्थानकात वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लायब्ररी जंक्शन’ला वाचकांची पसंती मिळताना दिसत आहे. अवघ्या महिन्याभरात ७०० हून अधिक वाचकांनी या उपक्रमाचा फायदा घेतला आहे. विशेष म्हणजे यात युवकांची संख्या उल्लेखनीय आहे. त्यामुळे सतत धावपळ असणाऱ्या चर्चगेट रेल्वे स्थानकात आता नवी वाचन संस्कृती रुजताना दिसत आहे.
वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे किंवा सध्याचे तरुण वाचनापासून दूर जात आहेत अशी चर्चा अनेकदा सर्वत्र ऐकू येते. मात्र, चर्चगेट रेल्वे स्थानकावरील ‘लायब्ररी जंक्शन’ शी जोडलेल्या युवा वाचकांची संख्या सर्वाधिक असल्याचे नोंदणीच्या तपशीलांवरून दिसून येत आहे. प्रोजेक्ट मुंबई आणि पश्चिम रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘एल.अँड टी’ च्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उद्घाटनापासूनच या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्याभरात वाचकांनी संख्या ७३२ इतकी झाली आहे, अशी माहिती येथील व्यवस्थापक सतीश पुथरन यांनी दिली. तरुणांकडून कथा, कादंबरी, प्रवासवर्णने यांसारख्या साहित्यप्रकारांना पसंती दिली जात असून यात युवकांची संख्या लक्षणीय आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकही या उपक्रमाशी जोडलेले असून त्यांच्याकडून आध्यात्मिक साहित्याविषयी विचारणा केली जाते, असेही सतीश यांनी सांगितले.
दैनंदिन प्रवासाठी उपनगरीय रेल्वेचा वापर
करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते डहाणू दरम्यान दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी अनेकांना वाचनाची आवड असते. मात्र, वेळेअभावी वाचनालयातून पुस्तके घेणे शक्य होत नाही. रेल्वे स्थानक परिसरातून वाचनासाठी पुस्तके घेणे आणि ती अगदी सहज बदलून घेता येणे शक्य होत असल्याने येथे वाचकांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच लोकल येण्यास अवधी असल्यास काही प्रवासी तो वेळ वाचनात घालवताना दिसतात.
दरम्यान,मराठीसह इतर प्रादेशिक पुस्तकांची संख्या सुरुवातीहून वाढताना दिसत आहे तर काही वाचक ‘लायब्ररी जंक्शन’ ला पुस्तके भेट म्हणूनही देत आहेत. सध्या पंधरा दिवसांसाठी एक पुस्तक घरी घेऊन जाण्याची मुभा आहे. त्यासाठी मोबाईल ॲपवर नोंदणी आवश्यक असून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत प्रवाशांना ‘लायब्ररी जंक्शन’ ला भेट देता येईल. लायब्ररी जंक्शनमध्ये विविध पुस्तके उपलब्ध असून ती प्रवासा दरम्यान सहज बदलता येतात. मी या आधी कोणत्याही वाचनालयाचे सभासदत्व घेतले नव्हते. मात्र, इथे अगदी छोट्या जागेत पुस्तकांचा मिळणारा सहवास हा आनंद देणारा आहे, असे ऋतुजा वेलणकर या विद्यार्थ्यांनीने सांगितले.
