सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ५० टक्के सवलत

सुधारित वाहनतळ धोरणाला दक्षिण मुंबईतील रहिवाशांकडून पुन्हा विरोध सुरू झाल्यामुळे पालिका प्रशासनाने ऐच्छिक स्वरूपात या योजनेला सुरुवात केली आहे. रहिवासी वाहनतळ योजनेंतर्गत ‘ए’ विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतीसमोरील रस्त्याचा काही भाग आरक्षित करून त्याठिकाणी रात्री वाहने लावता येतील. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहनतळांवर सुट्टीच्या दिवशी ५० टक्के सवलत देण्यात येणार असून पर्यटनस्थळांजवळील वाहनतळ मोफत उपलब्ध करण्यात येतील, असे ठरवण्यात आले आहे.

रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण यावे आणि रस्त्याची जागा व्यापणाऱ्या वाहनांच्या जागेच्या प्रमाणात शुल्क लागावे यासाठी वाहनतळांचे सुधारित धोरण आणले गेले आहे. नव्या धोरणानुसार व्यावसायिक भागातील वाहनतळाचे शुल्क तिपटीने वाढणार असून रस्त्यावर वाहने लावणाऱ्या रहिवाशांनाही रात्रीचे शुल्क द्यावे लागणार आहे. ए वॉर्डमधील अनेक जुन्या इमारतींमध्ये वाहनांसाठी पुरेशी जागा नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. आतापर्यंत मोफत असलेल्या जागांसाठी शुल्क देण्यास रहिवाशांनी विरोध केला असल्याने पालिकेने मंगळवारपासून सुधारित धोरण ऐच्छिक स्वरूपात लागू केले आहे. या धोरणानुसार ए विभागातील रहिवाशांनी सोसायटीमार्फत ए विभाग कार्यालयात अर्ज करून समोरील रस्त्यावरील जागेचा तपशील देणे गरजेचे आहे. ही जागा देण्यासाठी वाहतूक पोलीस व पालिकेच्या वाहतूक विभागाकडून परवानगी मिळाल्यावर एका वर्षांचे वाहनतळ शुल्क भरून ही जागा संस्थेच्या वाहनांसाठी एका वर्षांसाठी आरक्षित करण्यात येईल. या ठिकाणी रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वाहन उभे करता येणार असून त्याचे नियमन इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी करणे अपेक्षित आहे. ही योजना सरसकट सर्व रस्त्यांना लागू होणार नसून ती ऐच्छिक असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सुट्टीच्या दिवशी वाहनतळांवर सवलतीचे दर

सुधारित वाहनतळ धोरणानुसार शुल्कात वाढ होत असतानाच रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहनतळाच्या शुल्कात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. यासोबतच पर्यटनस्थळांच्या जवळील वाहनतळांवर वाहनांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, छत्रपती  शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय इत्यादी पर्यटनस्थळांच्या जवळ असणाऱ्या वाहनतळांवर सुट्टीच्या दिवशी गाडय़ा नि:शुल्क उभ्या करता येतील.