scorecardresearch

शहरबात : वेसण गरजेचीच!

मुंबईत करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर सातत्याने तिसरी लाट येणार अशी यंत्रणांकडून हाकाटी दिली जात होती.

प्रसाद रावकर 

मुंबईत करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर सातत्याने तिसरी लाट येणार अशी यंत्रणांकडून हाकाटी दिली जात होती. अखेर यंत्रणांचं भाकीत खरं ठरलं.  मुंबईत पुन्हा एकदा करोनापर्व सुरू झाले, पण नागरिक मात्र हे मानायला तयार नाहीत. र्निबध धाब्यावर बसवून नागरिकांचा दिनक्रम मात्र सुरूच आहे. टाळेबंदीत भोगले त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे मुख्य कारण त्यामागील आहे, असेच नागरिकांच्या कृतीबद्दल म्हणावे लागेल.

आता मुंबईत करोनाची तिसरी लाट आली आहे असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. पालिका प्रशासनाने मुंबईत करोनाबाधितांच्या शोधासाठी करोना चाचणीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या, बाधित रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या गटातील संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक चाचणी करीत आहे. त्याचा ताण प्रयोगशाळांवर येऊ लागला आहे. चाचणी अहवाल २४ तासांमध्ये पालिका आणि संबंधितांना देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र २४ तास उलटून गेल्यानंतरही अहवाल हाती पडत नाही आणि रुग्णांना आपण बाधित आहोत की नाही हे समजत नाही. करोनाबाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक, संशयित रुग्णांच्या मदतीसाठी पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयांमध्ये करोना नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. विभाग कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांच्या मदतीसाठी हे कक्ष सुरू झाले. करोनाचा अहवाल मिळत नसल्याने अनेक नागरिक या कक्षांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आहेत. पण त्याचे उत्तर कक्षात उपस्थित कर्मचाऱ्यांकडे नाही. नागरिकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे हे कर्मचारीही हतबल होऊ लागले आहेत. कक्षात नियुक्त कर्मचाऱ्यांना वेळोवेळी करोनाशी संबंधित सर्व माहिती देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, पण बहुधा तसे होताना दिसत नाही. परिणामी कर्मचारी बेतालपणे बोलत असल्याची तक्रार नागरिक करू लागले आहेत. करोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईतील त्रुटीचा हा झाला एक भाग.

 गेल्या दोन वर्षांतील टाळेबंदी, कडक र्निबधांच्या अनुभवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. टाळेबंदीच्या काळात अर्थार्जनावर झालेल्या परिणामामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. या कटू अनुभवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अनेक मंडळी तिसऱ्या लाटेत करोनाची भीती बाजूला सारून नोकरी, धंद्यासाठी घराबाहेर पडत आहेत. करोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सध्या मोठय़ा प्रमाणात होत आहे. सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे दिसू लागताच काही मंडळी तात्काळ चाचणी करून घेत आहेत. चाचणीच्या अहवालात करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच या मंडळींना सात दिवस गृहविलगीकरणात राहावे लागते किंवा प्रकृती गंभीर असल्यास रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. परंतु आजही बहुसंख्य मुंबईकर करोना चाचणी टाळून खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. परिणामी, खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यांबाहेर रुग्णांच्या रांगा लागत आहेत. डॉक्टरकडून सर्दी, खोकला आणि तापावरची औषधं घेऊन ही मंडळी घरीच राहात आहेत. काही मंडळी तर औषध घेऊन कामावर अथवा व्यवसायाच्या ठिकाणीही जात आहेत. अशा मंडळींमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे निश्चितच. एकूण परिस्थिती लक्षात घेता खासगी डॉक्टरांना सध्या चांगलेच दिवस आले आहेत असे म्हणावे लागेल. परंतु हा प्रकार संक्रमणाच्या दृष्टीने अतिधोकादायक आहे. हा धोका ओळखून पालिकेने खासगी डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अशा रुग्णांची पालिकेला माहिती द्यावी असेही पालिकेने डॉक्टर मंडळींना बजावले आहे.  मात्र डॉक्टर मंडळींकडून त्याला किती प्रतिसाद मिळेल हे सांगणे अवघडच आहे. मार्गदर्शन घेणारे डॉक्टर त्यानुसार वागणार का? हाही मुद्दा आहेच.

करोनाची लक्षणे असताना समाजात वावरणे इतर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. करोनाच्या दोन लसमात्रा घेतल्यामुळे किंवा सध्या करोनाचा धोका सौम्य असल्याने जीवावर बेतण्याची शक्यता कमी दिसत आहे. पण संसर्ग झपाटय़ाने पसरत आहे यात शंकाच नाही. त्यात चाचणी न करता करोना झाल्याचे दडवणाऱ्या मंडळींमध्ये धोका अधिकच वाढत आहे. अशा मंडळींना आवरण्यासाठी नियम अधिक कडक करण्याची गरज आहे. करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णावर खासगी दवाखान्यात उपचार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध माहिती दडविल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याची गरज आहे. एखाद दुसऱ्या भागातील डॉक्टर मंडळींवर कारवाई झाल्यास त्यामुळे जरब बसेल आणि रुग्णांची माहिती पालिकेला मिळण्यास सुरुवात होईल.

पालिका अथवा खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करणाऱ्यांपैकी किती जण बाधित होतात याची आकडेवारी पालिकादरबारी आहे. पण खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या बाधितांच्या संख्येबाबत पालिका अंधारातच आहे. परिणामी, मुंबईत एकूण किती करोनाबाधित आहेत याची नेमकी आकडेवारी यंत्रणांकडे नाही. कदाचित ही संख्या मोठी असेल. पण त्यामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. आपल्यामुळे होणारा संसर्गाचा प्रसार टाळून प्रत्येक रुग्णाने उपचार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेकडे रुग्णांची नोंद होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पण त्यासाठी माहिती दडविणारे रुग्ण असो वा डॉक्टर यांना वेसण घालणे गरजेचे आहे. तरच करोनाचा प्रसार नियंत्रणात आणणे यंत्रणांना शक्य होईल अन्यथा रुग्णवाढ होतच राहील.

prasadraokar@gmail.com

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: City necessity second wave corona patients ysh

ताज्या बातम्या