प्रसाद रावकर

गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. बाळ आणि त्याच्या वडिलांना मृत्यूने कवटाळले. आई आणि भाऊ रुग्णशय्येवर यातना सहन करीत आहेत. पण त्याच वेळी या दुर्घटनेचे राजकारण रंगू लागले आहे. राजकीय मंडळींची संवेदनशीलता किती बनावट आहे याचे दर्शन यानिमित्ताने मुंबईकरांना घडले.

महाराष्ट्र विधानसभेच्या मागील निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणेच बदलून गेली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. याचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. मुंबई महापालिका याला अपवाद नाही. नव्या वर्षांच्या पूर्वार्धात  देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे राजकारणाला रंग चढू लागला आहे. गेल्या २५ हून अधिक वर्षांपासून मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती आहे. पूर्वी शिवसेना-भाजपची युती एकत्रितपणे पालिकेत नांदत होती. सभागृह असो वा वैधिनाक समित्या उभय पक्षांचे नगरसेवक मांडीला मांडी जुळवून गुण्यागोिवदाने पालिकेवर राज्य करत होते. अर्थात समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांत तेव्हाही भाजपचे पदाधिकारी सेनेला नमवण्याची संधी सोडत नव्हते. पण आता  चित्र पालटले आहे. दोन्ही पक्षांतून विस्तव जात नाही, अशी परिस्थिती आहे. परस्परांना नमविण्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब सुरू झाला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी कधी सत्ताधाऱ्यांच्या, तर कधी विरोधकांच्या कळपात दिसू लागले आहेत. हे निव्वळ संधिसाधूपणाचे लक्षण म्हणावे लागेल, असो.

मुंबईमधील लोकसंख्या वाढल्यामुळे प्रभागांची संख्या वाढविण्याचा वटहुकूम नुकताच जारी झाला. आता लोकसंख्येच्या आधारे प्रभाग फेररचना, सीमा निश्चिती, आरक्षण सोडत आदी सोपस्कार पूर्ण होऊन निवडणुका जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यावर कहर म्हणजे पालिका सभागृहाच्या पहिल्याच प्रत्यक्ष बैठकीत शिवसेना आणि भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले. केवळ बैठकीतच नव्हे, तर नंतर सभागृहाबाहेरही एकमेकांसमोर ठाकले. निमित्त होतं ते स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर स्फोटात भाजलेल्या चार महिन्यांच्या बाळाच्या उपचारात झालेली हयगय आणि त्यामुळे त्याचा झालेला मृत्यू. आपापल्या परिसरातील नागरी कामे यशस्वीरीत्या पूर्ण व्हावी, सोयी-सुविधा मिळाव्या म्हणून मुंबईकर मतदारांनी या सर्वांच्या पारडय़ात मतांचा जोगवा टाकून त्यांना पालिकेत पाठविले. पण सुरुवातीपासूनच ही मंडळी आरोप-प्रत्यारोप परस्परांची उणीदुणी काढण्यात दंग आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत तर कुठे आहे नगरसेवक माझा असे बोलण्याची वेळ काही भागांतील मुंबईकरांवर ओढवली होती. आता विद्यमान नगरसेवकांची मुदत संपत आली आणि निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ समीप येऊन ठेपली आहे. त्यामुळे नव्या नव्या वादांना तोड फुटू लागलं आहे.

 खड्डेमय रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता, कचरा वाहून नेणाऱ्या गाडय़ांपोटी होणारा खर्च अशा नानाविध प्रकरणांवरून भाजपने शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कधी विरोधकांना हाताशी धरून तर कधी एकला चलो रेची भूमिका घेत भाजपने राजकीय खेळी खेळत शिवसेनेवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. कालांतराने यापैकी काही प्रकरणे हवेत विरून गेली, तर काही प्रकरणांत हाताशी काहीच लागत नसल्याने ती सोडून देण्यात आली. गेल्या आठवडय़ात मुंबईमधील वरळीच्या बीडीडी चाळीतील एका घरात स्वयंपकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि पुरी कुटुंबातील चार जण स्फोटात होरपळले. चार महिन्यांच्या बाळासह चौघांना घेऊन दोन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेने निघाल्या. कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मध्येच नायर रुग्णालयाच्या दिशेने एक रुग्णवाहिका गेली. मग कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा निर्णय रहित करून दुसरी रुग्णवाहिकाही नायर रुग्णालयात दाखल झाली. नियोजनात सुरुवातीपासूनच गोंधळ उडाला होता. त्यात भर म्हणजे नायर रुग्णालयात उपचारात दिरंगाई झाली आणि बाळ दगावले. मुंबईच्या महापौरपदावर डोळा असलेल्या भाजपच्या हाती आयतेच कोलीत लागले आणि राजकारण रंगू लागले. बाळासह चौघांना घेऊन रुग्णालयात पोहोचलेल्या काही मंडळींनी उपचारात होत असलेली हेळसांड मोबाइलच्या कॅमेरात बंदिस्त केली आणि ती समाजमाध्यमांवर फिरू लागली. भाजपने हीच संधी साधली आणि नायर रुग्णालयातील त्रुटींवर बोट ठेवून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. निषेधाचा पत्रप्रपंच करून भाजप थांबली नाही, तर स्थायी समितीत मुद्दा उपस्थित करून बैठक तहकूब करण्याची मागणी करण्याची व्यूहरचनाही आखली. आपली कोंडी टाळण्यासाठी शिवसेनेने बैठक तहकूब केली आणि त्यामुळे भाजपला गोंधळ घालता आला नाही. मग त्याच दिवशी दुपारनंतर पार पडलेल्या पालिका सभागृहाच्या बैठकीत बाळाच्या मृत्यूवरून भाजप नगरसेवक भलतेच आक्रमक झाले. स्थायी समितीच्या बैठकीत सुज्ञपणा दाखविणाऱ्या अध्यक्षांचा पालिका सभागृहात भाजप गटनेत्यांचे भाषण सुरू असताना तोल गेला. एकेरीवर उतरलेल्या अध्यक्षांनी मानपान खुंटीला टांगून ठेवले आणि वाद विकोपाला गेला. भाजप नगरसेवक आक्रमक झाले आणि उभय पक्षांचे नगरसेवक परस्परांसमोर ठाकले. बाका प्रसंग निर्माण झाला. सभागृहात नगरसेवकांना शांत करून बाका प्रसंग कसबसा निस्तरला. हे वृत्त वाऱ्याच्या वेगाने मुंबईत पसरले. त्याच वेळी नगरसेवक सभागृहातून बाहेर पडत होते आणि सभागृहाबाहेरील रस्त्यावरच शिवसैनिकांनी भाजप नगरसेवकांची वाट अडवली. उभयतांमध्ये बाचाबाची झाली. हे नाटय़ बराच काळ सुरू होतं.

नोटबंदी, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या किमतीतील चढ-उतार आदी विविध प्रश्नांवरून नागरिकांमध्ये भाजपबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यापैकी बहुतांश वाईट प्रतिक्रियाच कानावर येत आहेत. अशा वेळी भाजप ठोस अशा मुद्दय़ाच्या शोधात होती आणि आता शिवसेनेच्या नगरसेवकाच्या बेताल वर्तणुकीमुळे तो भाजपच्या हाती लागला. पालिका निवडणुकीतही बालकाच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपकडून होणारी टीका शिवसेनेला सोसावी लागणार हे नक्कीच. गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. बाळ आणि त्याच्या वडिलांना मृत्यूने कवटाळले. आई आणि भाऊ रुग्णशय्येवर यातना सहन करीत आहेत. पण त्याच वेळी या दुर्घटनेचे राजकारण रंगू लागले आहे. राजकीय मंडळींची संवेदनशीलता किती बनावट आहे याचे दर्शन यानिमित्ताने मुंबईकरांना घडले. मुंबईकर मतदार सुज्ञ आहे. सत्तेवर असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाने कितीही आदळआपट केली, तरी मुंबईकर मतदार कोणावर विश्वास टाकणार हे आताच सांगणे अवघड आहे. पण बाळाच्या मृत्यूनंतर नगरसेवकांमध्ये झालेल्या राडय़ावरून राजकारण्यांनी संवेदनशीलता खुंटीला टांगून ठेवल्याचेच दर्शन घडले. तेव्हा मुंबईकरांनी कावेबाज राजकारण्यांना ओळखून मतदानाच्या वेळी योग्य तो निर्णय घेणे सुज्ञपणाचे लक्षण ठरेल.

prasadraokar@gmail.com