scorecardresearch

शहर, उपनगरांत प्रत्येकी तीन नवे प्रभाग

राज्य सरकारने मुंबईमधील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्याबाबत घोषणा केल्यानंतर महापालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे डोळे प्रभाग रचनेकडे लागले आहेत.

महापालिकेतील वाढलेल्या प्रभागांचे वाटप निश्चित

प्रसाद रावकर

मुंबई : राज्य सरकारने मुंबईमधील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्याबाबत घोषणा केल्यानंतर महापालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे डोळे प्रभाग रचनेकडे लागले आहेत. लोकसंख्येचा अंदाज घेत प्रभागांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आले असून पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आराखडय़ानुसार शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग वाढल्याचे संकेत मिळाले आहेत. कुर्ला ते गोवंडी, घाटकोपर ते मुलुंड, अंधेरी आणि मध्य मुंबईतील प्रभागांची संख्या वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा तीन विभागांमध्ये विभागली आहे. मुंबईत २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नसली तरी पुनर्विकास, विकासकामे लक्षात घेऊन प्रभाग वाढीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग वाढले आहेत. शहरामधील मध्य मुंबईमधील प्रभागांची संख्या तीनने वाढली आहे, तर पूर्व उपनगरांमध्ये कुल्र्यापासून गोवंडी दरम्यानच्या परिसरात दोन, तर घाटकोपर आणि मुलुंड दरम्यानच्या टप्प्यात एक प्रभाग वाढला आहे. पश्चिम उपनगरांतील अंधेरी आणि आसपासच्या परिसरात तीन प्रभाग वाढल्याचे समजते.  मुंबईमध्ये २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार शहर भागातील लोकसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या १० वर्षांत परिस्थितीत अनेक बदल झाले आहेत. या भागातील चाळींच्या जागेवर मोठय़ा संख्येने बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत.

तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत इमारती उभ्या राहिल्या आहेत. आदी बाबी लक्षात घेऊन मध्य मुंबईतील प्रभागांच्या संख्येत तीनने वाढ करण्यात आल्याचे समजते. कुर्ला ते गोवंडी आणि घाटकोपर ते मुलुंड, तसेच अंधेरी आणि आसपास वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन तेथील प्रभागांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: City three new wards each suburbs ysh

ताज्या बातम्या