मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देशभरात सुरु केलेल्या आंदोलनामुळे मुंबईतील राजकारणही ढवळून निघाले आहे. या आंदोलनामुळे देशातील तरुण पिढी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उतरत असल्याचे चित्र आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाने या आंदोलनाला दिलेला पाठिंबा आणि केलेली सक्रीय मदत यामुळे लोकसभा निवडणूकीत बेरजेचे वेगळे राजकारण पाहायला मिळू शकते अशी चर्चा आहे.

रविवारी शिवाजी पार्क येथे जमलेल्या आंदोलकांच्या समर्थनार्थ शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याबरोबरीने त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे हे देखील रस्त्यावर उतरले. आजवर राजकारणापासून दूर असलेले तेजस हे जेन झीच्या समर्थनार्थ उतरल्यामुळे ठाकरेंच्या या भूमिकेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांसाठी कॉक्रोच जनता पार्टीने देशभरात आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनीही सगळी शक्ती पणाला लावली आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीच्या या आंदोलनाचे रविवारी मुंबईत चांगलेच पडसाद उमटले.

दिल्लीसह देशाच्या अन्य भागात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ रविवारी मुंबईत आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र शिवाजी पार्क येथे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. आंदोलकांच्या सुटकेसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे रस्त्यावर उतरले होते. आंदोलनकर्त्यांची सुटका करावी या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने शिवाजी पार्क बरोबरच वरळी आणि ताडदेव पोलिस ठाण्यातही ठिय्या दिला होता. आंदोलकांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडी आदित्य ठाकरे यांनी अडवल्यामुळे काही काळ शिवाजी पार्क परिसरात तणावही निर्माण झाला होता. आंदोलकांना सोडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.

सीजेपीच्या आंदोलनाच्या वृत्तांमध्ये ठाकरे बंधूंची पुढची पिढी रस्त्यावर उतरल्याच्या घटनेची जास्त चर्चा झाली. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत असताना आदित्य यांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या कारवाईला विरोध केल्यामुळे त्याला अधिक महत्त्व आले आहे. सीजेपी हा कोणताही राजकीय पक्ष नाही तर ती एक चळवळ आहे. त्यामुळे या विषयात थेट राजकारण नसले तरी भविष्यातील राजकारणाची नांदी नक्कीच यात आहे.

सीजेपीच्या आंदोलनाने मुंबईत केवळ निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा ऐरणीवर आलेला नाही. तर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणापुढेही नवे प्रश्न उभे केले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरण, शिक्षण प्रणालीतील त्रुटी आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने दिल्लीत पहिले आंदोलन केले होते. त्या आंदोलनालाही उद्धव ठाकरे यांनी सर्वात प्रथम पाठिंबा जाहीर केला होता. उद्धव ठाकरे यांनी स्वत: दिल्लीतील जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. सीजेपीच्या पहिल्या आंदोलनामुळे देशातील आणि राज्यातील राजकीय पक्षांमध्येही प्राण फुंकले. देशातील तरुण पिढीतील असंतोषाला वाट मिळाली आहे. त्यामुळे तरुण पिढीला नक्की काय हवे याचे उत्तर प्रस्थापित राजकीय पक्षांना मिळाले आहे.

आतापर्यंत विकासाच्या मुद्द्यावर भाजपने तरुण पिढीला आपल्याकडे आकर्षित केले होते. मात्र बेरोजगारी, पेपरफुटी यामुद्द्यामुळे तरुण पिढीत असलेल्या रागाचे पर्यवसान या आंदोलनात झाले आहे. चळवळीच्या अत्यंत कठीण काळात शिवसेना (ठाकरे) पक्षाने आंदोलनकर्त्यांना केलेली मदत ही भविष्यात वेगळी युती ठरणार आहे का हे येत्या काळातच कळेल.

सीजेपीच्या आंदोलनामुळे भाजपविरोधी पक्षांना तरुणांशी निगडीत मुद्दे मिळाले आहेत. सीजेपीने निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचा विषय लावून धरला असताना त्याच विषयावर काँग्रेसनेही आंदोलन केले. मात्र काँग्रेसने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. सीजेपी उद्या राजकारणात उतरल्यास काँग्रेसला प्रतिस्पर्धी पक्ष ठरू शकतो. त्यामुळे काँग्रेस या चळवळीपासून अंतर राखून आहे.

मनसे आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यातील राजकीय स्पर्धा जुनी आहे. मराठी अस्मिता, मुंबईवरील राजकीय वर्चस्व आणि स्थानिक प्रश्नांवर दोन्ही पक्षांची भूमिका ही नेहमीच चर्चेचा विषय असते. या दोन्ही पक्षांचे मतदार हे मराठी आहेत. मात्र सीजेपीच्या चळवळीतील तरुण पिढी ही विशेषत: अमराठी, दलित, मुस्लिम अशी आहे. ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्यामुळे भविष्यात मतांची बेरीज होणार का हे देखील पाहावे लागणार आहे. शिवसेना, मनसे आणि सीजेपी यांची आंदोलनामागील भूमिका, राजकीय उद्दिष्ट्ये आणि रणनीती एकसारखी नाही. त्यामुळे या सर्व शक्ती एकाच व्यासपीठावर दीर्घकाळ एकत्र राहतील का हे देखील येत्या काळात समजू शकेल.