मुंबई : राज्यात झालेल्या सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्याने कोणत्या पक्षाला अधिक जागा मिळाल्या हे स्पष्ट होते नाही. तरीही बहुतेक नेत्यांनी आपापल्या प्रभाव क्षेत्रांमध्ये वर्चस्व कायम राखल्याचे चित्र आहे.

राज्यातील २४८२ ग्रामपंचायती जिंकून भाजपने राज्यात पहिला क्रमांक कायम ठेवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ८४२ ग्रामपंचायती जिंकल्याची माहिती भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली. भाजपच्या दाव्यानुसार, भाजप आणि शिंदे गटाने मिळून ३,२०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाला यश मिळाल्यानेच विधान भवनाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी परस्परांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. या वेळी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.

Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
rohit pawar, supriya sule, baramati lok sabha
अजित पवारांनी केलेल्या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे आघाडीवर; रोहित पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे अडीच लाख मतांनी…”
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…

काँग्रेसने ९०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या असून, महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायती आणि सरपंचपदे जिंकल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच आम्हीच पहिल्या क्रमांकावर आहोत हा भाजपचा दावा खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील २३६ पैकी २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या असून ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट असल्याचे स्पष्ट होते, असेही पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीनेही १३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना अशा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. मनसेला मिळालेल्या यशाबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

राज्यातील ७,६८२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. शिंदे- फडणवीस सरकारने कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार सरपंचांची थेट निवडणूक झाली. एकूण ६५,९१६ सदस्यांच्या निवड करण्यात आली. ६९९ सरपंचांची निवडणूक बिनविरोध पार पडली तरी तर ६३ सरपंचापदाकरिता एकही अर्ज दाखल झाला नव्हता. महानगरपालिका, नगरपालिका वा जिल्हा परिषदांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जातात. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून पक्षीय बलाबल दिले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांची माहिती मात्र आयोगाकडून दिली जात नाही. त्यातूनच सर्व पक्ष आम्हालाचा सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा करतात.

दगडफेकीत एकाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर जल्लोषाला गालबोट लागले. विजयी मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीत एका तरुण कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला तर तीन कार्यकर्ते जखमी झाले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द गावात भाजपच्याच दोन गटांमध्ये लढाई होती. विजयी पॅनलचे उमेदवार मिरवणुकीने देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असताना विरोधी गटाने घरांच्या छपरावरून जोरदार दगडफेक केली.

महाविकास आघाडीचे यश, भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष

महाविकास आघाडी – ३२५०

राष्ट्रवादी – १५२३

कॅाग्रेस – १००१

शिवसेना (उद्धव ठाकरे) – ७२६

भाजप – शिंदे गट

भाजप – २३१८

शिंदे गट – ८२१

अपक्ष व इतर – १३६२

बाळासाहेब थोरात, रोहित पवारांना धक्का

नगर:जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. म्काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे ग्रामपंचायतीवर भाजपने विजय संपादन केला असून आमदार रोहित पवार यांनाही कर्जतमध्ये पराभवाची धूळ चारली आहे. माजीमंत्री भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या चिरंजीवाला त्यांच्याच घरातील चुलत भावाकडून पराभव स्वीकारावा लागला.

 महसूल मंत्री विखे यांनी त्यांच्या राहाता तालुक्यातील सर्व म्हणजे १२ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले तर ठाकरे गटाचे माजीमंत्री आ. शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील सर्व १३ ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवले. याशिवाय वंचित बहुजन आघाडी (पाथर्डी) व मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाने (पाथर्डी) प्रत्येकी एका ठिकाणी सत्ता मिळवली. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्यात वर्चस्व ठेवले. कोल्हापूर जिल्ह्य़ात माजी मंत्री सतेज पाटील तसेच हसन मुश्रीफ यांना त्यांच्या मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला आहे.

गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कन्येचा विजय, पॅनल पराभूत

जळगाव : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाचे शिल्पकार म्हणून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केलेले प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाली. परंतु, त्यांच्या पॅनलचा पराभव झाला.  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेरमधील मोहाडी ग्रामपंचायतीत  भाविनी पाटील उमेदवार असल्याने सर्वाचे लक्ष लागून होते.  भाविनी पाटील या विजयी झाल्या. परंतु, त्यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलला लोकशाही उन्नती पॅनलने पराभवाचा धक्का दिला. गेल्या पाच वर्षांत भाविनी पाटील यांनी गावात समाधानकारक विकास कामे केल्याने ग्रामस्थांनी त्यांना कौल दिला.