|| प्रसाद रावकर

‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत पालिकेचे स्वच्छतेवर भर

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात अव्वल स्थान मिळावे यासाठी महापालिकेकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत होते. मात्र टाळेबंदीच्या काळात पालिकेच्या परिश्रमावर विरजण पडले असून ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी पुन्हा एकदा श्रीगणेशा करण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे.

  केंद्र सरकारच्या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेवर भर देणाऱ्या योजनांवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, सफाई कामगारांना प्रशिक्षण आणि गौरव, सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी प्रोत्साहन आदींवर भर देत पुन्हा एकदा ‘स्वच्छ भारत’मध्ये मुंबईला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा

केल्यानंतर राजकारणी, अधिकारी मंडळी हाती झाडू घेऊन रस्ता, कार्यालये स्वच्छ करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकत होती. नगरसेवक वार लावून भल्या पहाटे सफाई कामगारांसोबत रस्त्यांवर दिसू लागले. मात्र दिखाऊपणावर टीका होऊ लागताच हे प्रकार आटोक्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस कार्यालयात स्वच्छता करण्याची सक्तीही करण्यात आली होती. हळूहळू अभियानाच्या निकषांमध्ये बदल होत गेले आणि त्याअंतर्गत कार्यक्रमही बदलत गेले.

हागणदारी मुक्त शहराची अट लक्षात घेऊन पालिकेने उघड्यावर प्रात:विधी उरकणाऱ्यांचा शोध घेतला आणि ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालयांची वाहने उभी केली. पक्क्या शौचालयांची दुरुस्ती, स्वच्छतेवरही भर देण्यात आला. त्यानंतर मुंबई हागणदारी मुक्त असल्याचे प्रमाणपत्र मुंबईला मिळाले. ओला- सुका कचरा वेगवेगळा ठेवणे, मोठ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले होते. काही सोसायट्यांकडून खतनिर्मितीला प्रतिसादही मिळाला होता. तसेच ओला-सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी जनजागृतीही करण्यात येत होती. निकषांची पूर्तता व्हावी यासाठी पालिकेकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत होती. मात्र मार्च २०२० मध्ये मुंबईत करोनाबाधित रुग्ण सापडला आणि त्यानंतर टाळेबंदी, संचारबंदी लागू झाली. मुंबईतील संपूर्ण कारभार ठप्प झाला. त्यामुळे कचऱ्याचे वर्गिकरण, ओला-सुका कचरा स्वतंत्र ठेवणे, सोसायट्यांमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याची योजना बारगळू लागली. या संदर्भात उपायुक्त संगीता हसनाळे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्ना के ला असता होऊ शकला नाही.

प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असल्याची कबुली

केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत ‘आझादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमाअंतर्गत सफाई कामगारांचा गौरव, कचऱ्याचे विलगीकरण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, सफाई कामगारांसाठी प्रशिक्षण, गौरव आणि कार्यशाळांचे आयोजन, स्वेच्छाग्राहींमार्फत घरोघरी जनजागृती आदी निकष समविष्ट करण्यात आले. या निकषांच्या पूर्ततेसाठी पालिकेने कंबर कसली आहे. मात्र टाळेबंदीमुळे जनमानसात आलेली मरगळ लक्षात घेता या निकषांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असल्याची कबुली पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.