मुंबई: ‘सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत’ बनविण्यासाठी राबविण्यात येत असेलल्या ‘एक तारीख एक तास स्वच्छता’ मोहिमेंतर्गत रविवारी राज्यभरात तब्बल ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबिवण्यात आली. गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून गिरगाव चौपाटी येथे त्याचा शुभारंभ झाला. हेही वाचा >>> उत्सवांमधील उन्मादावर राज ठाकरे यांचे टीकास्त्र; बीभत्सपणा कमी करण्यासाठी प्रयत्नांचे आवाहन ‘सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत’ बनविण्यासाठी आपण टाकलेले हे मोठे पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची लोकचळवळ झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. स्वच्छता हीच सेवा हे अभियान महत्त्वाचे असून ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे. आजचा दिवस झाला की संपले, असे नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असे होता कामा नये. स्वच्छतेत राज्याला देशात अव्वल स्थान मिळवून देऊ या, असे आवाहनही शिंदे यांनी केले. या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरी भागात १४ हजार ५५२ ठिकाणी स्वच्छतेचे उपक्रम घेण्यात आले. त्यात जवळपास दोन हजार टन कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यात आली. याशिवाय ग्रामीण भागात ५८ हजार २४७ ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. मुंबईतल्या झोपडपट्टय़ा स्वच्छतेचे मुख्यमंत्र्यांचे आदेश स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी महापालिका आयुक्तांना दिले. कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर झोपडपट्टी पुनर्विकास वसाहतीची दुर्दशा पाहून संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याबरोबरच गल्लीबोळातील रस्त्यांची, झोपडपट्टी परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास ’ या राज्यस्तरीय मोहिमेच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक वत्सलाताई नाईक नगर वसाहतीला भेट दिली आणि तेथील शौचालय आणि परिसराच्या साफसफाईची पाहणी केली. महापालिका अधिकाऱ्यांना यापूर्वीच निर्देश देऊन दिवसातून पाच वेळा साफसफाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना फैलावर घेतले. मुंबईत १७८ ठिकाणी स्वच्छता श्रमदान * मुंबईत महापालिकेच्या रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत १७८ ठिकाणी जनसहभागातून स्वच्छता श्रमदान करण्यात आले. * संपूर्ण मुंबईतील श्रमदानात असंख्य नागरिक, लोकप्रतिनिधी, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, खेळाडू, उद्योजकांनीही श्रमदान करून अभियानात सहभाग नोंदवला. * गिरगाव चौपाटी (स्वराज्यभूमी) वरील श्रमदानामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, इस्रायलचे भारतातील वाणिज्यदूत कोब्बी शोशानी, नॉर्वेचे भारतातील वाणिज्यदूत अर्ने जॅन फ्लोलो, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राज, नौदलाचे व्हाइस एडमिरल दिनेश त्रिपाठी, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. * केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), वेगवेगळय़ा स्वयंसेवी संस्था- संघटना, खासगी- सहकारी बँका, अंगणवाडी कर्मचारी, विविध व्यापारी संघटना, गणेश मंडळे, महाविद्यालयीन विद्यार्थी, अनिरुद्ध अकादमी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि इतर स्वयंसेवी संघटना व संस्थांचे स्वयंसेवक सहभागी झाले. * या अभियानात लोकप्रतिनिधींबरोबरच मराठी- हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सलीम खान, अनुपम खेर, उदित नारायण, सुनील शेट्टी, तुषार कपूर, अरबाज खान, सुरेश ओबेरॉय, नील नितीन मुकेश, पंकज त्रिपाठी, वंदना गुप्ते, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, नेहा भसीन, हर्षदा खानविलकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, स्वप्निल जोशी, अभिजीत केळकर, अरुण नलावडे, जयवंत वाडकर, प्रदीप कबरे, सुहास शिरसाठ आदी सहभागी झाले. * या उपक्रमाअंतर्गत गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई- मनोरी या चौपाटय़ांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविली. गडकिल्ल्यांच्या स्वच्छता, संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षांनिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोकचळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गडकिल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवडी किल्ला येथे ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत गडकिल्ल्यांच्या राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ फडणवीस यांनी केला. विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी यावेळी उपस्थित होते.