‘स्वच्छते’च्या परीक्षेसाठी महापालिकेचा कसून अभ्यास

सुमारे वीसेक कर्मचारी कार्यरत असलेल्या या वॉररूममध्ये पालिकेचा अभ्यास तर जोरात चालल्याचे दिसून येते.

BMC , Diwali bonus 2017 , Mumbai, festival , salary , wages, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुख्यालयातील तळघराच्या दालनाला ‘वॉररूम’चे रूप

वर्षभर अभ्यासाची टाळाटाळ करून ऐन परीक्षेच्या वेळी रात्रंदिवस कसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसारख्या अवस्थेतून सध्या मुंबई महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी जात आहेत. देशभरातील स्वच्छ शहरे ठरवण्यासाठी जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या परीक्षेत ‘नापास’ होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने सध्या जोरदार तयारी चालवली आहे. आजवर केवळ आपत्कालीन परिस्थितीत ‘वॉररूम’ बनणारे पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक सहासमोरील तळघराचे दालन सध्या अशाच ‘परीक्षार्थी’नी भरलेले आहे. येथे कुणी घरगुती शौचालयांचे अर्ज पडताळत आहे, तर कुणी सार्वजनिक शौचालयांतील सुविधांची नोंद करत आहे, कुणी जमा होणाऱ्या कचऱ्याबद्दलची नोंद करत आहे, तर कुणी जनजागृतीच्या उपायांवर चर्चा करत आहे. सुमारे वीसेक कर्मचारी कार्यरत असलेल्या या वॉररूममध्ये पालिकेचा अभ्यास तर जोरात चालल्याचे दिसून येते.

महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक सहासमोरच तळघराचा दरवाजा आहे. पूर्वी येथे कडेकोट बंदोबस्तात आपत्कालीन विभागाचे काम सुरू असायचे. कधी काही आपत्कालीन स्थिती उद्धवली की या भागाला वॉररूमचे स्वरूप यायचे. वर्षभरापूर्वी आपत्कालीन विभाग दुसऱ्या मजल्यावर गेला आणि केवळ माहिती तंत्रज्ञान विभागाचे तुरळक कर्मचारी या तळघरात वावरू लागले. मात्र गेल्या चार दिवसांपासून या तळघराच्या एका दालनाला पुन्हा एकदा वॉररूमचे स्वरूप आले आहे.

तळघरातील अंधाऱ्या दालनात डोकावले तरी कोणी मान वर करून पाहत नाही.. मोठय़ा मेजाभोवती बसलेल्या वीसेक जणांपैकी किमान दहा-बारा जण मान कलती करून मोबाइलवर बोलण्यात दंग असतात. घरगुती शौचालयांसाठी किती अर्ज आले होते, किती शौचालयांना परवानगी दिली, सार्वजनिक शौचालयात वीज आहे का, पाण्याची सोय किती ठिकाणी नाही.. अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू असते. अधूनमधून संगणकाच्या पडद्यावर नजर टाकली जाते. शंका विचारल्या जातात. माहितीची देवाणघेवाण होते. कागदावर तक्त्यात माहिती भरली जाते आणि पुन्हा मोबाइलला कान लावून पुढचे प्रश्न सुरू होतात.. स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षा आता अगदी तोंडावर आली आहे. आधीच्या वर्षी निकालावरून आईवडिलांची बोलणी खावी लागलेल्या विद्यर्थ्यांप्रमाणे पालिका अधिकारी यावेळी झटून काम करताहेत.

वर्षभरात झालेल्या कामांची माहिती एकत्रित करण्यासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे सहा गट करण्यात आले आहेत. कचरा गोळा करणे व वाहतूक, कचऱ्यावरील प्रक्रिया व व्यवस्थापन, स्वच्छता, लोकांमधील जनजागृती, क्षमतेमधील वृद्धी आणि कल्पक योजना अशा सहा वेगवेगळ्या प्रकारात माहिती देणे अपेक्षित आहे. प्रत्येक गटात गरजेनुसार दोन ते चार कर्मचारी आहेत. वॉर्डमध्ये दूरध्वनी करून माहिती घ्यायची आणि ती नोंदवायची, एवढेच काम या कर्मचाऱ्यांकडे आहे. पण एखादी माहिती मिळवण्यासाठी दहादहा वेळा दूरध्वनी करावे लागतात. त्यामुळे आम्हाला पाणी पिण्यासाठी उठतानाही दहा वेळा विचार करावा लागतो, असे येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

हातचे गुण राखण्याचा प्रयत्न

जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात होत असलेल्या या परीक्षेच्या ४००० गुणांपैकी १४०० गुण हे नागरिकांचा प्रतिसाद आणि १२०० गुण थेट पाहणीसाठी आहेत. उरलेले १४०० गुण हे स्वच्छतेसंबंधी केलेल्या कामाच्या माहितीसाठी आहेत. हे म्हणजे हातचे गुण. नागरिकांचा प्रतिसाद किंवा पाहणीबाबत पालिका फारसे काही करू शकत नसल्याने किमान माहितीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

स्वच्छता अ‍ॅपचा प्रतिसाद

शहरातील स्वच्छतेबाबत किती नागरिक सक्रिय सहभाग घेतात यावरही गुण दिले जातात. गेल्यावेळी या भागात पालिकेचे गुण कमी झाले होते. या परीक्षेच्या नियमानुसार किमान दोन टक्के  नागरिकांनी अ‍ॅपच्या माध्यमातून सहभाग घ्यायला हवा. मुंबईची १ कोटी २४ लाख लोकसंख्या पाहता किमान अडीच लाख लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करायला हवे. त्यासाठी पालिकेकडून गेल्या १५ दिवसांपासून प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या  ६५ हजारांच्या आसपास आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cleanliness issue in mumbai bmc

ताज्या बातम्या