मे महिन्याच्या सुटीत मामाच्या गावाला जायचे की आणखी कुठे फिरायला जायचे, याचे बेत आतापासूनच आखले जात असतील. शिक्षकवर्गही या सुटीकडे डोळे लावून बसलेला असेल. मात्र, विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा सुटीचा आनंद हिरावून घेण्याचा चंगच दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी बांधला आहे. १ ते १५ मे या कालावधीत मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचा अजब आदेशच शिक्षण निरीक्षण कार्यालयातर्फे काढण्यात आला आहे. दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी फेब्रुवारी महिन्यात एक पत्र काढले असून त्यात सर्व शाळांनी १ ते १५ मे या कालावधीत ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करावा आणि त्या संदर्भातील अहवाल शिक्षण निरीक्षक कार्यालयात सादर करावा, असे आदेश दिले आहेत. यामुळे मुंबईतील शिक्षकांचा गोंधळ उडाला आहे. राज्य शासनाने १२ एप्रिल २०१३ रोजी अध्यादेश जारी केला असून त्या आदेशात सर्व सरकारी आस्थापनांमध्ये १ ते १५ मे हा कालावधी ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील अमराठी भाषकांमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच त्यांच्या मुखी मराठी रुळावी या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आदेश दिले आहेत. या निमित्ताने सरकारी आस्थापनांमध्ये विविध कार्यशाळा, तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात यावीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोणत्या सरकारी आस्थापनांमध्ये हा पंधरवडा साजरा करावा याचा उल्लेखही अध्यादेशात करण्यात आला आहे. मात्र, त्यात शाळांचा कुठेही उल्लेख नाही. असे असतानाही शिक्षण निरीक्षकांनी असा आदेश काढून शाळांना हा पंधरवडा साजरा करण्यास का सांगितले हा प्रश्न शाळांना पडला आहे.