मुंबई : हवामान बदलाच्या संकटाविषयी जनजागृती करण्यासाठी सहा कलाकारांनी एकत्र येऊन पहिल्या बहुभाषिक ‘रॅप’ अल्बमचे सादरीकरण केले. ‘क्लायमेट इमर्जन्सी मिक्सटेप’चा बंगळुरू येथील ‘द हमिंग ट्री’ येथे नाद घुमला. मराठी, कन्नड, तमिळ व हिंदी भाषेतील गीत लेखक व रॅपर्स या प्रकल्पासाठी एकत्र आले आहेत. यात मुंबईतील समाजशास्त्राची विद्यार्थिनी देवांशी पवार हिचाही समावेश आहे.
‘क्लायमेट इमर्जन्सी मिक्सटेप’ हा ‘युथ की आवाज’, ‘क्रांतिनारी’, ‘असर’, ‘सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायझर्स’, ‘फोकसोल’ व ‘क्लायमेट कल्चर कनेक्टिव्ह’ यांनी हा उपक्रम राबवला. त्यात ‘निसर्गाचा कायदा’ या मराठी गाण्याचा समावेश आहे.
निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडे केवळ आर्थिक फायद्याच्या नजरेतून पाहिले, तर त्याचे परिणाम काय होतात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे गाणे मुंबईतील रॅपर देवांशी हिने लिहिले असून गायनही तिनेच केले आहे. या मराठी गाण्यात आर्थिक विकासाच्या हव्यासापोटी माणसाने जंगले, वन्यजीव व शेतजमिनींचे स्वरूप कसे बदलले याचा वेध घेण्यात आला आहे.
आपला परिसर व समाजाशी जोडलेल्या स्वतःच्या अनुभवांच्या माध्यमातून वातावरण बदलाच्या कथा मांडण्यासाठी ‘हिप हॉप’चा वापर करण्यात आला. कलाकारांनी आपल्या आजुबाजूच्या वास्तवावर आधारित लिहिलेली गाणी हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. ‘निसर्गाचा कायदा’ या मराठी गाण्यासोबतच बंगळुरूमधील पाणीटंचाई, अरवली पर्वतरांगांचा ऱ्हास, प्रदूषण, पूर, दुष्काळ व नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला नाश अशा विविध समस्यांचा समावेश आहे.
‘निसर्गाचा कायदा’ या गाण्यातून मला माझ्या आवडत्या विषयावर व्यक्त होण्याची संधी मिळाली असून कोकणातील आणि विदर्भातील समस्यांवर मी या गाण्यातून भाष्य केले आहे, असे देवांशी हिने सांगितले.
