नरेंद्र मोदींच्या लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची धूळधाण झाली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. नीलेश राणे यांच्या पराभवामुळे जनतेने नारायण राणे यांची कोकणातील दादागिरी मोडून काढली आहे. या निकालाचा फायदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत होईलच, पण आम्ही हुरळून न जाता अधिक जोमाने काम करणार आहोत. – विनोद तावडे, भाजप
चर्चा आमदारांची पहिल्या दोन तासांतच निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊ लागल्यावर वायव्य मुंबई मतमोजणी केंद्रात आलेले पक्ष कार्यकर्त्यांंवरील ताण निवळू लागला. दुपारच्या जेवणापर्यंत मोजणीचे काम आटोपत आल्याने निवडणुकांचे निकाल व त्याच्या विश्लेषणाची चर्चा रंगली होती. ही चर्चा नंतर गेली ती विधानसभेच्या निवडणुकांवर. यावेळी खासदार म्हणून शिवसेनेचे तीनही उमेदवार जिंकून आल्याने दुसऱ्या फळीतील उमेदवारांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाचा पत्ता कापणार याची चर्चा शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये रंगली

तीन हजार लाडू
उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी घेतलेली आघाडी महाराष्ट्रात सर्वाधिक होती. १९ व्या फेरीनंतर आपल्या मतांची आघाडी स्पष्ट झाल्यानंतर येथील मतमोजणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना शेट्टी यांच्यातर्फे लाडूवाटप सुरू झाले. लाडूचे बॉक्स कार्यकर्ते घेऊन येऊ लागले. अवघ्या १५ मिनिटांत तब्बल तीन हजार लाडूंचा फडशा येथे उडविण्यात आला.
हा मतदारांचा विजय आहे. मतदारांना प्रस्थापितांचा प्रचंड संताप आला होता. त्याचा हा परिणाम आहे. केवळ शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची चाल मनसे खेळली. मात्र मतदारांनी त्यांना जोरदार तडाखा दिला आहे.
– गजानन कीर्तीकर
मी हा पराजय स्वीकारत आहे. गजानन कीर्तीकर यांचे अभिनंदन. मुंबईकरांचे हीत लक्षात घेऊन मी यापुढेही काम करत राहीन.
गुरुदास कामत

इंदिरा लाटेत तेव्हा काँग्रेसला ४३ जागा  
नरेंद्र मोदी लाटेत राज्यात ४२ जागा जिंकून महायुतीने सर्वानाच आश्चर्यचकित केले आहे. युतीचे नेते ३२ ते ३५ जागांबाबत आशावादी होते. एवढय़ा जागाजिंकणे महायुतीच्या नेत्यांसाठी धक्काच होता. यापूर्वी राज्यात १९८४ मध्ये
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या सहानभुतीच्या लाटेत राज्यातील ४८ पैकी ४३ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. १९८०मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्या, त्यावेळीही काँग्रेसला ३९ जागा मिळाल्या होत्या.