मुंबई : राज्य सरकारने ब्रह्ममुंबई महानगर पालिकेला (बीएमसी) हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आयओटी आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एक सर्वसमावेशक नियंत्रण यंत्रणा विकसीत करावी. या यंत्रणेद्वारे शहरात होणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकामांचे निरीक्षण आणि नियंत्रण करावे, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधान परिषदेत अॅड अनिल परब यांनी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील हवा प्रदूषणाचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. कोणतेही नियम न पाळता शहरात इमारतींचे तोड काम केले जाते. काही बांधकाम व्यावसायिक कुणाचेच ऐकत नाहीत, ते निर्ढावले आहेत. सरकारच्या संकेतस्थळावरील माहिती चुकीची कशी असू शकते, असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला.
हिवाळ्यानंतर हवेत धूळ, धुरके वाढते.
तापमान कमी आणि आद्रर्ता जास्त, अशी स्थिती असल्यामुळे सध्या प्रदूषण वाढले आहे. शहरात वेगाने बांधकाम होत आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या वाढली आहे. प्रदूषण वाढविणाऱ्या सरकारी बांधकामांवरही निर्बंध लागू केले आहेत. राज्य सरकार आणि बीएमसीची यंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहे. गतवर्षापेक्षा यंदा प्रदूषण कमी आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएमसीला सर्वसमावेशक यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.

