गेल्या चार दिवसांपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांनी कामावर रूजू होण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरूवार) विधानसभेत केली. राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांना आपला संप मागे घ्यावा असे ते म्हणाले. तसेच डॉक्टरी पेशा हा अत्यंत नोबल व्यवसाय असून हा पेशा स्वीकारताना घेतलेली शपथ त्यांनी विसरू नये याची आठवण त्यांनी करून दिली. त्याचप्रमाणे सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा कोणालाच अधिकार नाही. उपचाराविना कोणी गरिबाचा जीव जाऊ नये याचे भान ठेवून सेवेत परत या सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस हे डॉक्टरांच्या संपाबाबत विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले, आज डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे राज्यातील सर्वसामान्य, गरीब नागरिक त्रस्त झाले आहेत. एखाद्या व्यक्तीने मारहाण केल्यामुळे गरजू रूग्णांना वेठीस धरणे योग्य नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गरिबांचा जीव जातोय. सामान्य रूग्णांना खितपत ठेवणे हे चुकीचे आहे. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. ही चर्चा एकाच बैठकीत संपणारी नाही. आम्ही डॉक्टरांना सुरक्षा देण्यास कटिबद्ध आहोत. ज्या लोकांनी डॉक्टरांवर हल्ला केला आहे, त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. राज्य सरकार डॉक्टरांच्या पाठीशी आहे. मीही त्यांच्याशी चर्चा करणार आहे. गरिबांच्या हितासाठी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.