मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा. रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करून कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.

जनतेला तत्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेतला. ज्या भागात वाहनांची जास्त रहदारी असल्याने वाहतूक कोंडी होते, त्या भागातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रस्ते आणि आनुषंगिक प्रकल्पांना गती द्यावी, नव्या प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सादर करण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले.

वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. वसई-विरार बहुउद्देशीय मार्गामुळे भिवंडी- कल्याण- डोंबिवली- उल्हासनगर या भागांतील वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात कमी होणार  आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.

ठाण्यातील मार्ग : ठाण्यातील आनंदनगर टोल नाका ते साकेत मार्ग, कोपरी-पटणी पूल, तीन हात नाका मार्गाची पुनर्बाधणी, भिवंडी जोडणारा पूल, ठाणे कोस्टल मार्ग, ऐरोली बोगदा ते काटई नाका मार्ग या प्रकल्पांची कामे गतीने करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गामुळे वाहतुकीचे विभाजन होऊन ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. या मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. मात्र आता हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.