scorecardresearch

“अजित पवारांनी सकाळी साखर झोपेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा…”, अधिवेशनात एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली.

Eknath Shinde on Oath of Ajit Pawar
एकनाथ शिंदेंची अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर टोलेबाजी (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत मी इथं सगळ्या सुरसकथा सांगू इच्छित नाही, अन्यथा अनेक लोकांची पंचायत होऊ शकते, असा सूचक इशारा दिला. ते शुक्रवारी (३ मार्च) विधानसभेत बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “सत्तांतर झाल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून अजित पवारांना धक्का बसला असं ते भाषणात म्हणाले. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही अवाक झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, याबाबत फडणवीस आणि मला दोघांनाही याबाबत माहिती होती. आम्ही ते ठरवून घेतलं आहे.”

“अजित पवारांनी सकाळी साखर झोपेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा…”

“असं असलं तरी अजित पवारांनी सकाळी साखर झोपेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा मला फोन आला होता. मला म्हणाले फोन लावा आणि मी टीव्ही सुरू केला. बघितलं तर तिथं अजित पवार शपथ घेताना दिसले. मी त्यांना म्हटलं हे मागचं आहे, तर म्हटले मागचं नाही, आत्ताचंच आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

“अजित पवारांच्या शपथविधीच्या सुरसकथा हळूहळू बाहेर येत आहेत”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “त्यावेळी मी जयंत पाटलांना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही. जयंत पाटीलही तिथंच असल्याचं मला सांगण्यात आलं. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी त्यात फार जात नाही, ते जुनं झालं आहे. याबाबतच्या अनेक सुरसकथा हळूहळू बाहेर येत आहेत. दोन-चार सुरसकथा देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्या. त्यांनीही सगळ्या सांगितल्या नाहीत.”

हेही वाचा : फुटक्या काचाच्या बसवर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात अधिवेशनात झळकल्यानंतर कर्मचारी निलंबित, अजित पवार म्हणाले…

“सगळ्या सुरसकथा सांगितल्या तर अनेकांची पंचायत होऊ शकते”

“ते मी इथं बोलू इच्छित नाही. त्यामुळे अनेक लोकांची पंचायत होऊ शकते. परंतू फडणवीसांनी जे सांगितलं ते अर्धच सांगितलं आहे. मात्र ते जेव्हा सर्व सांगतील तेव्हाही सर्वांना धक्का बसेल,” असा इशारा शिंदेंनी दिला. यानंतर फडणवीस एकनाथ शिंदेंना पूर्ण सांगू नका असं म्हटले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 18:43 IST
ताज्या बातम्या