scorecardresearch

‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच’ ; परवानगी मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विश्वास

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी, शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने चर्चा झाली.

‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच’ ; परवानगी मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विश्वास
(संग्रहित छायाचित्र) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला. तसेच हा मेळावा यशस्वी करण्यासाठी, शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने चर्चा झाली. याचबरोबर पोलीस ठाण्याजवळ गोळीबाराचा आरोप आमदार सदा सरवणकर यांच्यावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर चुकीचे वागू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्वाना केली.

या बैठकीनंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचा दसरा मेळावा होणारच. पण ठिकाण अद्याप अंतिम झालेले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवाजी पार्क मिळाले नाही तरी दसरा मेळावा घ्यायची तयारी शिंदे गटाने सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानाचाही विचार सुरू आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या