Premium

शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde Sharad Pawar 3
शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत तक्रार दिली. आता त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी शुक्रवारी (९ जून) ट्वीट करत या प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे. तसेच त्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत.”

“शरद पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊ”

“शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

हेही वाचा : मोठी बातमी: “तुमचाही दाभोलकर होणार”, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी!

“राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान”

“औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल,” असा थेट इशारा एकनाथ शिंदेंनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde first reaction on life threat to sharad pawar pbs

First published on: 09-06-2023 at 15:36 IST
Next Story
जीवे मारण्याची धमकी आल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…