scorecardresearch

“अरे हे काय चाललंय तुमचं?” अजित पवारांना संजय शिरसाटांचा सवाल; गुवाहाटी दौऱ्यावर दिलं प्रत्युत्तर!

संजय शिरसाट म्हणतात, “ज्यांचे बळी जायचे होते ते गेलेलेच आहेत. अजित पवारांनी देवीच्या दर्शनाच्या आडून…!”

“अरे हे काय चाललंय तुमचं?” अजित पवारांना संजय शिरसाटांचा सवाल; गुवाहाटी दौऱ्यावर दिलं प्रत्युत्तर!
संजय शिरसाट यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर! (फोटो – संग्रहित छायाचित्र)

जवळपास तीन महिन्यांनी पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी शिंदे गट गुवाहाटी दौऱ्यावर जात असून राजकीय वर्तुळात त्यावरून तुफान चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गट या दौऱ्यादरम्यान कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे. सत्तास्थापनेच्या आधी बोललेला नवस पूर्ण करायला जात असल्याची प्रतिक्रिया यातल्या काही आमदारांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी या दोऱ्यावरून शिंदे गटाला लक्ष्य केलेलं असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यावरून विरोधकांना लक्ष्य केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामाख्या देवीच्या दर्शनावरून शिंदे गटाला टोला लगावला होता. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवारांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “ते कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले आहेत. काही ठिकाणी आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो. तसं तिथं रेडा कापला जातो म्हणतात. रेड्याचा बळी देतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही. पण जर दर्शनाच्या कामाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो”, असं अजित पवार म्हणाले होते.

“ज्यांचे बळी जायचे ते गेलेलेच आहेत”

दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “देवीच्या दर्शनाला आपण जातो तेव्हा असं वक्तव्य करू नये. भक्तीने आपण जातो, तेव्हा चुकीचा अर्थ का काढतात लोक? ४० रेड्यांचा बळी वगैरे बोललं गेलं. ज्यांचे बळी जायचे होते ते गेलेलेच आहेत. तुम्ही देवीच्या दर्शनाच्या आडून असं राजकारण करू नये”, असं संजय शिरसाट टीव्ही ९ शी बोलताना म्हणाले आहेत.

“आम्ही चांगल्या मनाने चाललो आहोत. आम्हाला चांगल्या पद्धतीने दर्शन घ्यायचं आहे. एवढीच आमची त्यामागे भावना आहे. बाकी काहीच नाही. अजित पवार दरवेळी देवीच्या ‘दर्शनाला गेले तर भानगडी, शंकराच्या दर्शनाला गेले तर भानगडी’ असं बोलत असतात. अरे हे काय चाललंय तुमचं? तुम्ही असं नका बोलू ना. देवीच्या दर्शनासाठी ज्याची त्याची भावना असते”, असंही शिरसाट म्हणाले.

“आता हे कुणाचा बळी द्यायला चाललेत ते…”, अजित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; केसरकरांचाही केला उल्लेख!

दरम्यान, अजित पवारांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही टीकास्र सोडलं आहे. “टीका होण्याचं कारण काय? देव दर्शनाला जाणं चूक आहे का? ज्यांच्या नशिबात नाही, त्यांनी टीका करावी. आमचं भाग्य आहे की अशा पवित्र ठिकाणी आम्ही जात आहोत. महाराष्ट्रासाठी मागणंच मागायला जात आहोत. बाकी आमच्या इतर इच्छा तर पूर्ण झाल्याच आहेत”, अशा शब्दांत भरत गोगावले यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 08:05 IST

संबंधित बातम्या