मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच अधिकृत शिवसेना असल्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांनी सोमवारी सकाळी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेत तेथील उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या तसबिरी हटविल्या.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाच्या सर्व ५६ आमदारांनी सभागृहात उपस्थित राहून पक्षादेशाचे पालन करावे अन्यथा आमदारकी गमवावी लागेल, असा इशारा पक्षाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील आमदारांना दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री शिंदे यांना बहाल केल्यानंतर शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना पत्र पाठवून विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी केली होती.
गैरहजर राहिल्यास कारवाई – सरनाईक
अधिवेशनात शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे. पक्षाचे प्रतोद भरत गोगावले त्यासंदर्भात लवकरच पक्षादेश देणार असून कोणीही त्याचे उल्लंघन करू नये. जे सदस्य पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर दिला. तर आजच्या बैठकीत खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली.