मुंबई : गेली दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली साजऱ्या होणाऱ्या सणोत्सवांवरील सर्व निर्बंध हटविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली़  दहिहंडी, गणशोत्सव, मोहरमवर कोणतेही अवास्तव निर्बंध लागू करू नका, नियमांचा बाऊ करू नका, असे आदेश शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी, तसेच आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली.

 ‘‘गेली दोन वर्षे आपण करोनाच्या सावटाखाली होतो़  त्यामुळे सण उत्साहाने साजरे करता आले नाहीत. यंदा गणेशोत्सव, दहीहंडी हे सण उत्साहाने, जल्लोषात साजरे व्हावेत, यासाठी सरकारमार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल’’, असे शिंदे यांनी सांगितल़े  यंदा सर्व मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच उत्सवाच्या काळात राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील, या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे आदेशही शिंदे यांनी यावेळी दिले.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, कोकणात जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात एसटी बस उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गणेशोत्सव मंडळांना नवीन नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा देण्याबरोबरच नोंदणी शुल्क माफ करण्याचे तसेच गणेशोत्सव काळात पोलीस विभागाकडून घेण्यात येणारे हमीपत्र न घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

दहीहंडी उत्सव साजरा करताना न्यायालयाने बाल गोविंदांबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. संपूर्ण राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. नियम पाळले गेलेच पाहिजेत. मात्र, प्रशासनाने नियमांचा अवास्तव बाऊ न करता मंडळांना सहकार्य करावे. तसेच जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईमध्ये बेस्टतर्फे सर्व विसर्जन ठिकाणे, तसेच विसर्जन मार्गावर पुरेशी वीज पुरवठय़ाची व्यवस्था करावी, अशी सूचना शिंदे यांनी केली़  गणेशपर्व हे महत्वाचे पर्व आहे. हे पर्व उत्साहात साजरे करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, काही अडचणी असतील त्या परस्पर सहकार्याने सोडवाव्यात, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.

पाहा व्हिडीओ –

या बैठकीला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे जयेंद्र साळगांवकर, अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे हितेश जाधव, मूर्तीकार संघटनेचे अण्णा तोंडवळकर तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे

गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनिप्रदूषण किंवा इतर तत्सम गुन्हे नोंदवले गेले असतील तर ते मागे घ्यावेत, अशी सूचना शिंदे यांनी पोलिसांना केली़  तसेच गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी पुरस्कार योजना सुरू करण्याच्या अनुषंगाने योग्य ते धोरण निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिल़े

गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंधही हटवले

यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत़  मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांना प्रशासनाला केल्या. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) मूर्तीबाबत निर्णय घेण्यासाठी एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील, अशी माहिती शिंदे यांनी बैठकीनंतर दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde lift covid restrictions during ganesh festival zws
First published on: 22-07-2022 at 00:01 IST