राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची बातमी अफवा असल्याचं शिंदे यांच्या कार्यालयामार्फत सांगण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. मात्र आता शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ही भेट झालीच नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर ही अफवा पसरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी शिंदे आणि पवार यांच्या जुन्या फोट्याच्या आधारावर रात्री उशीरा हा दोन्ही नेत्यांची सिव्हर ओकवर भेट झाल्याच्या बातम्या दिल्या होत्या. मात्र अशाप्रकारची कुठलीही भेट झालेली नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही यासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये,” असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे.

२१ जून रोजी शिंदे हे काही निवडक आमदारांसोबत सुरतला गेले. त्यानंतर २२ जूनच्या मध्यरात्री हे सर्वजण गुवहाटीला गेले. सातत्याने या बंडखोर गटाकडून राष्ट्रवादीमुळे शिवसेनेच्या आमदारांवर आणि नेत्यांवर अन्याय होत असल्याचे आरोप करण्यात आलेले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीवाटपामध्ये कधीच भेदभाव झाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. राष्ट्रवादीने शिवसेनेचे आमदार बंड करुन गेल्यानंतरही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र उद्धव यांनी २९ जून रोजी राजीनामा दिल्यानंतरच्या सत्तानाट्यादरम्यान शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.

शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते. याकडे लक्ष वेधण्यात आले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी, आमची हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून नैसर्गिक युती आहे. या सरकारला अडीच वर्षे कोणताही धोका नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलदार व मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्री पद मिळाले. आमच्यामध्ये चांगला समन्वय असून मतभेद होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे  अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आमच्या सरकारमागे भक्कमपणे उभे असल्याने सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केलेला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde office denies the report of cm meeting ncp chief sharad pawar says news is rumor scsg
First published on: 06-07-2022 at 11:34 IST