विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधीमंडळातली पहिली लढाई शिंदे यांनी जिंकली आहे. राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली. त्यानंतर राहुल नार्वेकर यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. सर्व सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडला. यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे आभार मानले.

“गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडल्या त्याचे आपण साक्षीदार आहोत. आज राज्यामध्ये शिवसेना-भाजपाचे राज्य स्थापन झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार आणि त्यांची भूमिका आम्ही पुढे घेऊन निघालो आहोत. आमच्या सहकाऱ्यांचा सहभाग यांच्यामध्ये लागले आहे. मी विनम्रपणे सांगू इच्छितो की या सभागृहामध्ये विरोधी बाकांकडून सत्ताधारी बाकांकडे जाण्याच्या घटना घडल्या आहेत. पण सत्तेतून पायउतार होऊन ही माणसे बाहेर गेली याची देशाने याची दखल घेतली आहे. माझ्यासोबत आठ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. एककीकडे देशाचे मोठे नेते होते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक एकनाथ शिंदे होता. ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. कुणावरही जबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. देवेंद्र फडणवीस ११५ लोक होते आणि माझ्याकडे ५० लोक असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्री पद दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांना धन्यवाद देतो,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“सगळ्यांना वाटलं होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदेंना काय भेटणार. पण मला काही नको होते. परंतु भाजपाने माझा सन्मान केला. सर्व पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय भाजपाने घेतला,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“विधानभवन लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेकांना यानंतर मोठी संधी प्राप्त झाली आहे. देशपातळीवरही त्यांना गौरवण्यात आलं आहे. सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना फक्त राज्यातील नव्हे तर देशातील आणि परदेशातील लोक हा ऐतिहासिक क्षण डोळे भरुन अनुभवत आहेत. कालपर्यंत आपण कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतात. पण आता व्यक्तिमत्वाला या न्यायालयातील शिरपेच मिळाला आहे. या पदाचा, मान, सन्मान, दर्जा मोठा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.