cm eknath shinde told about helicoptor ride experince during samruddhi highway work spb 94 | Loksatta

“हेलिकॉप्टर १० फुटांपर्यंत खाली-वर जात होतं, अन् मी…”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला थरारक अनुभव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान आलेला हेलिकॉप्टर प्रवासाचा थरारक अनुभव सांगितला.

“हेलिकॉप्टर १० फुटांपर्यंत खाली-वर जात होतं, अन् मी…”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला थरारक अनुभव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संग्रहित छायाचित्र

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण उद्या (११ डिसेंबर) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमासाठी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महामार्गाच्या कामादरम्यान आलेला हेलिकॉप्टर प्रवासाचा थरारक अनुभव सांगितला.

हेही वाचा – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव का दिलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण; म्हणाले, “मी मंत्री असताना…”

“तेव्हा हेलिकॉप्टर १० फुटांपर्यंत वर-खाली जात होतं”

“समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध होता. बुलढाण्यात एके ठिकाणी शेतकऱ्याने विरोध केला होता. आधीच्या प्रकल्पाचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे तो जमीन द्यायला तयार नव्हता. त्यावेळी त्यांना जमीनीचा चांगला मोबदला मिळेल, असे मी सांगितले. तेव्हा मी त्यांच्या खरेदीपत्रावर साक्षीदार म्हणून मंत्री असताना स्वाक्षरी केली. तिथून चार तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. आम्ही जेव्हा तिथून निघालो, तेव्हा आम्ही हेलिकॉप्टर प्रवासाचा थरारक अनुभव घेतला. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते. ढगाळ वातावरण होतं. पायलटने ढगातून हेलिकॉप्टर काढलं. तेव्हा ते १० फुटांपर्यंत वर-खाली जात होतं. मोपलवार वगैरे आम्ही सर्व त्या हेलिॉप्टरमध्ये होतो. माझ्याही मनात थोडी भीती होती. मात्र, मी ‘तुमची प्रॉपर्टी कुठंय सांगा वगैरे’ अशी गंमत करत त्यांना धीर देत होतो”, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – “हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “तुमच्या तिजोरीत येणारे पैसे…”

“देवेंद्र फडणवीस गाडी चालवण्यात एक्सपर्ट”

यावेळी देवेंद्र फडणवीसांबरोबर समृद्धी मार्गावर केलेल्या प्रवासाचा अनुभवही त्यांनी सांगितला. “यापूर्वीही मी समृद्धी महामार्गावर गाडी चालवायचा अनुभव घेतला होता. मात्र, त्यादिवशी देवेंद्र फडणवीसांचा ड्राईव्ह करायचा मुड होता. त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं. सुरुवातीला थोडी धाकधूक वाटली, पण देवेंद्र फडणवीस गाडी चालवण्यात एक्सपर्ट आहेत. आमच्या या ड्राईव्हची दखल पंतप्रधान मोदींनीही घेतली होती. मी दिल्लीत गेलो, तेव्हा त्यांनी मला याबाबत विचारलं होते”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या…”, संजय राऊतांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!

“पर्यावरणाचा विचार करूनच महामार्ग बनवण्यात आला”

“एमएसआरडीसीचे खात्याची जबाबदारी आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मला मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर समृद्धी महामार्गाची जबाबदारी माझ्यावर आली. यासाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या लवकर मिळाल्या. याला काही लोकांचा विरोध होता. हा रस्ता होणारच नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. जमीन अधिग्रहणदेखील आव्हानात्मक होतं. यावेळी नागरिकांनी विरोध केला. यादरम्यान जंगल पर्यावरण, प्राणी सर्वांचीच काळजी घ्यायची होती. प्राण्यांसाठी आम्ही ९२ ठिकाणी अंडरपास केले. आठ ओव्हरपास केले आहेत. वन्यजिवांना आपण जंगलाच्या बाहेर आलोय, असं वाटू नये यासाठी आम्ही ३५० कोटी रुपये खर्च करून झाडे लावली आहेत. वन्यजिवांना त्रास न देता, पर्यावरणाचा विचार करूनच हा महामार्ग बनवण्यात आहे. हे खरोखर आव्हानात्मक काम होते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 12:22 IST
Next Story
जुहू हत्या प्रकरण : मृत महिलेची भीती खरी ठरली…दुसरी तक्रार केल्यानंतर सहा दिवसांनी महिलेची हत्या